Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावर सर्वात गाजणारा आणि चर्चेत असणारा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’मराठीला ओळखलं जातं. आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शोचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सर्वांची प्रतीक्षा आता संपली असून कलर्स मराठी वाहिनीने ‘बिग बॉस’मराठीच्या पाचव्या सीझनची अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे. फक्त यावेळी होस्ट म्हणून महेश मांजरेकरांच्या ऐवजी एका नव्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र जवळपास दोन वर्षे ज्या शोची आतुरतेने वाट पाहत होता त्याची घोषणा अखेर करण्यात आलेली आहे. लवकरच ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, यावेळी या कार्यक्रमाचं होस्टिंग महेश मांजरेकर करणार नाहीत. वाहिनीवरून शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये यंदा बिग बॉसचं होस्टिंग कोण करणार त्या अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे.

हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार ‘बिग बॉस’चा पाचवा सीझन? ‘तो’ प्रोमो पाहताच नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन लवकरच नव्या सरप्राइजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी ‘बिग बॉस मराठी’चं होस्टिंग बॉलीवूडचा स्टार आणि प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. ‘कलर्स मराठी’ आणि जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शोची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओला वाहिनीने “मराठी मनोरंजनाचा ‘BIGG BOSS’ सर्वांना ‘वेड’ लावायला येतोय…’लयभारी’ होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख!” असं कॅप्शन दिलं आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॉसिप, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अनुभवायला मिळेल.

हेही वाचा : Video : ‘मुरांबा’ फेम सुलेखा तळवलकरांनी घेतली नवीन गाडी! म्हणाल्या, “कपड्यांनी भरलेल्या वॉर्डरोबपेक्षा…”

हेही वाचा : “मतदानासाठी ६ तासांचा प्रवास करून आले, पण…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री का झाली नाराज? पोस्ट शेअर करत म्हणाली…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत पार पडलेल्या पर्वांबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे, दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे, तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम, तर चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव कोरलं होतं. आता हा नवीन पाचवा सीझन केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.