Indrayani Fame Actor Engagement : मराठी कलाविश्वात सध्या लगीनसराई सुरू आहे. सनई-चौघडे वाजत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी या नवीन वर्षात त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. नुकतंच ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने अभिनेता अंशुमन जोशीबरोबर लग्नगाठ बांधली. अपूर्वानंतर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक संदीप खरे यांची लेक आणि अभिनेत्री रूमानी खरे हिचा विवाहसोहळासुद्धा पार पडला आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्याने साखरपुड्याची गुडन्यूज शेअर केली आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधत नवीन नात्याची सुरुवात केली. अभिनेत्री रेवती लेले, विशाल निकम-अक्षया हिंदळकर, अपूर्वा नेमळेकर, अपूर्वा गोरेनंतर नुकतीच रूमानीनेसुद्धा लग्नगाठ बांधली. अभिनेता स्तवन शिंदेबरोबर तिचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरील अभिनेता चिन्मय पटवर्धननंसुद्धा त्याच्या लग्नाची खुशखबर शेअर केली आहे.
‘इंद्रायणी’मधील अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत तो गोपाळ ही भूमिका साकारत होता. नुकताच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपताच चिन्मयनं साखरपुडा झाल्याची खुशखबर शेअर केली आहे. अभिनेत्याने होणाऱ्या पत्नीबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्याने गुडघ्यावर बसून होणाऱ्या पत्नीच्या हातात साखरपुड्याची अंगठी घातली. तसंच “In other words please be true…. In other words I love You” अशी रोमँटिक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. चिन्मयच्या होणाऱ्या पत्नीचं नाव मृण्मयी परांजपे असं आहे.
चिन्मय पटवर्धनने शेअर केले साखरपुड्याचे फोटो
चिन्मयनं मृण्मयीबरोबरचे साखरपुड्याचे फोटो शेअर करताच त्याच्यावर कलाविश्वातील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अभिनेत्याने शर केलेल्या फोटोखालील कमेंट्समध्ये रितिका श्रोत्री, अनिता दाते-केळकर, सानिका बनारसवाले, ऐश्वर्या नारकर, कांची शिंदे, तेजस बर्वे, निषाद भोईर, ऋषी मनोहर यासह अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा या फोटोला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
चिन्मय पटवर्धनच्या कामाबद्दल थोडक्यात…
दरम्यान, चिन्मय पटवर्धन हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. २०१९मध्ये रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित असलेली ‘स्वामिनी’ मालिका आली होती. या मालिकेत चिन्मयने माधवरावांची भूमिका साकारली होती. यानंतर त्यानं नाटक आणि शॉर्ट फिल्म्समधून विविधांगी भूमिका साकारल्या. सध्या तो ‘मी Vs मी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
