Colors Marathi Serial Off Air : छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच दोन नव्या मालिकांची घोषणा केली. यामुळेच या वाहिनीवर साधारण दोन वर्षे सुरू असलेली लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या मुख्य नायिकेने नुकतीच याबाबत भावनिक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.

‘कलर्स मराठी’वर २५ मार्च २०२४ रोजी ‘इंद्रायणी’ ही मालिका सुरू झाली. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना इंदूचा हृदयस्पर्शी प्रवास पाहायला मिळाला. पण, आता लवकरच ही प्रेक्षकांची लाडकी इंदू सर्वांचा निरोप घेणार आहे. ‘इंद्रायणी’ची भूमिका साकारणाऱ्या मुख्य अभिनेत्री कांची शिंदेने सोशल मीडियावर “इंद्रायणीचा प्रवास संपला” अशा आशयाची भावनिक पोस्ट शेअर केली होती.

आता या पाठोपाठ ‘इंद्रायणी’मधील आणखी एका अभिनेत्याने सेटवरचे काही आठवणीतले फोटो शेअर करत या मालिकेचा निरोप घेतला आहे. अभिनेता सिद्धांत उमरीकर यामध्ये पप्या हे पात्र साकारत होता. अभिनेत्याने “विठुराया… पप्याचा राम कृष्ण हरी!” म्हणत चाहत्यांचा पप्याच्या भूमिकेतून निरोप घेतला आहे.

इंद्रायणी मालिकेचं शूटिंग ७ मार्च २०२५ रोजी सुरू झालं होतं आणि या मालिकेचं शूटिंग २१ फेब्रुवारीला पूर्ण झालं, असंही सिद्धांतने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

‘इंद्रायणी’मध्ये कांची शिंदेसह अनिता दाते, संदीप पाठक, संतोष जुवेकर असे लोकप्रिय कलाकार झळकले आहेत. तर मालिकेत छोट्या इंदूची भूमिका बालकलाकार सांची भोयरने साकारली होती. ही मालिका ऑफ एअर होणार असल्याची माहिती समोर येताच प्रेक्षक देखील नाराज झाले आहेत. कांचीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी “मालिका का एवढ्या लवकर संपवताय” अशाही कमेंट्स केल्या होत्या. एकंदर सगळेच इंद्रायणीला मिस करणार आहेत.

दरम्यान, ‘कलर्स मराठी’वर येत्या काही दिवसांत ‘मी जिंकून घेईन सारं’! ही नवीन मालिका सुरू होत आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी तांबट आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर प्रमुख भूमिकेत झळकताना दिसणार आहेत. या मालिकेच्या प्रसारणाची तारीख अन् वेळ कलर्स मराठीकडून लवकरच जाहीर केली जाईल.