Colors Marathi Indrayani Serial Off Air : छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या आघाडीच्या वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या दृष्टीने मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’, ‘झी मराठी’ या पाठोपाठ ‘कलर्स मराठी’ने सद्धा त्यांच्या दोन नव्या मालिकांची घोषणा केलेली आहे. या मालिकांचा मुहूर्त लवकरच जाहीर केला जाईल. मात्र, कोणत्याही नव्या मालिका सुरू होताना काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे.

गेल्या २ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिका आता सर्वांचा निरोप घेणार आहे. मालिकेची मुख्य नायिका अभिनेत्री कांची शिंदेने सेटवरचे काही Unseen फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

‘इंद्रायणी’ मालिका मार्च २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दोन वर्षे पूर्ण होत असतानाच ही सिरियल सर्वांचा निरोप घेणार आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेचं शूटिंग २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्ण झालं आहे. “…आणि इंद्रायणीचा प्रवास संपला २१-०२-२०२६” असं कॅप्शन देत कांचीने शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सगळेच कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय कांचीने या प्रवासात तिने ज्या-ज्या कलाकारांबरोबर काम केलं; त्यांच्याबरोबरचे खास फोटो, मालिकेच्या सेटवरच्या ऑफस्क्रीन फोटोंची झलक सुद्धा चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंना कांचीने “दिसं येती दिसं जाती माय गो” असं कॅप्शन दिलं आहे.

कांचीने शेअर केलेल्या पोस्टवर इंद्रायणी मालिकेच्या चाहत्यांनी सुद्धा भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मालिका का संपवली अशा मालिकांची फार गरज होती..बाकी रामकृष्णहरी!”, “उगाच संपवली मालिका….चांगला Track आणून मालिका चालू ठेवायला पाहिजे होती”, “प्रेक्षकांना या जोडीने अक्षरशः वेड लावलं…”, “कांची तू केलेली मेहनत आणि तुझी तुझी जिद्द आज कुठेतरी पूर्ण झाली”, “खूप छान मालिका होती खूपच सुंदर… विठ्ठल भक्ती कशी असावी याचं प्रत्यक्ष दर्शन देणारी मालिका”, “मिस यू इंदू…” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कांचीने शेअर केलेल्या पोस्टवर दिल्या आहे.

दरम्यान, आता ‘इंद्रायणी’ मालिका केव्हा संपणार याचा अधिकृत प्रोमो लवकरच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जाईल. याशिवाय ‘इंद्रायणी’च्या जागी कोणती नवी मालिका ऑन एअर होईल हे सुद्धा लवकरच स्पष्ट केलं जाईल.