छोट्या पडद्यावरील काही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांचा निरोप घेतात. तर, याउलट काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. अशाच एका लोकप्रिय मालिकेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका कलर्स मराठीवर डिसेंबर २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेचे आजवर सतराशेहून अधिक भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही मालिका घराघरांत प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र, आता या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे.

‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत गेली पाच वर्षे अभिनेता अक्षय मुदावडकर श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारत होता. मात्र, आता या अभिनेत्याने स्वामींच्या भूमिकेतून निरोप घेतला आहे. मालिकेत आता महानिर्वाणाचा अध्याय सुरु झाला आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी ज्येष्ठ कलाकाराची निवड करण्यात आली आहे. आता मालिकेत इथून पुढे अक्षयऐवजी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे स्वामींची भूमिका साकारणार आहेत. गेली पाच वर्षे स्वामींची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल अक्षय मुदावडकरने ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे आभार मानले आहेत.

Award Banner

अक्षय मुदावडकर भावना व्यक्त करत म्हणाला, “नमस्कार! गेली पाच वर्षे आणि जवळपास १७५० हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारायला मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि हा स्वामींचा आशीर्वाद मानतो. त्याचबरोबर गेली पाच वर्षे तुम्ही रसिक प्रेक्षकांनी माझ्यावर जे प्रेम केलंत…त्याकरता मी तुमचा कायम ऋणी असेन. पण, जेव्हा एखादा प्रवास सुरू होतो, तेव्हा हा प्रवास कुठेतरी थांबणार हे निश्चित असतं. त्याचप्रमाणे माझा सुद्धा स्वामींच्या भूमिकेतील प्रवास हा इथवरच होता. पण, हा प्रवास आज तरी थांबत असला तरी ही भूमिका आणि हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी कायम स्पेशल असेल. भविष्यात मी विविध भूमिका केल्या तरी स्वामींची भूमिका माझ्यासाठी कायम अग्रस्थानी असेल. तेव्हा पुन्हा एकदा मी तुम्हा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. कलर्स मराठी वाहिनीचे आभार मानतो, निर्मात्यांनी मला संधी दिली त्यामुळे त्यांचेही आभार…म्हणून मला ही भूमिका साकारता आली.”

colors marathi
ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे आता स्वामींची भूमिका साकारणार

“यापुढे आपली भेट मालिकेत होणार नसली तरीही मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर सक्रिय आहे. मी सगळे अपडेट्स तिथे शेअर करेन. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ!” असं अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं.

दरम्यान, अक्षयने शेअर केलेल्या या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “खूप सुंदर भूमिका तुम्ही साकारलीत… खूप छान तुमच्यामुळे आम्ही स्वामीमय झालो”, “सर तुम्ही साकारलेली भूमिका कायम आमच्या लक्षात राहील”, “श्री स्वामी समर्थ सर तुम्ही सुंदर काम केलंत” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.