Zee Marathi Shubh Shravani Serial : झी मराठीच्या ‘शुभ श्रावणी’ मालिकेत शुभू आणि श्रावणी या दोघांनीही नुकतीच एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आहे. आता श्रावणी श्रीमंत घरची आणि त्यातही शिक्षणमंत्र्यांची मुलगी असते. श्रावणीचे बाबा अलकनंदामुळे तिचा तिरस्कार करत असतात. त्यामुळे एवढ्या सगळ्या अडचणी असताना शुभू-श्रावणीचं प्रेम लग्नापर्यंत पोहोचेल का? आणि या दोघांबद्दल समजल्यावर स्वीटी काय करणार असे बरेच प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. पण, अशातच या मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याची अपडेट ‘झी मराठी’ने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. आता एखाद्या जोडप्याने नव्याने आयुष्याची सुरुवात करायचं म्हटलं की, या दोघांना एकत्र येऊ न देण्यासाठी नेहमीच तिसरी व्यक्ती मालिकांमध्ये सज्ज असते. शुभू-श्रावणीच्या प्रेमाच्या प्रवासात अडथळे निर्माण करण्यासाठी स्वीटी कायम तयार असते. पण, या सगळ्यात मालिकेत आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवर साधारण वर्षभरापूर्वी ‘लय आवडतेस तू मला’ ही मालिका सुरू होती. यामध्ये अभिनेता तन्मय जक्काने प्रमुख भूमिका साकारली होती. त्याला मालिकेत सगळे प्रेमाने आणि आदराने ‘सरकार’ म्हणायचे. प्रेक्षकांच्या या लाडक्या सरकारने आता ‘झी मराठी’च्या मालिकेत एन्ट्री घेतली आहे. तसेच यापूर्वी त्याने झी मराठीच्या ‘लवंगी मिरची’ मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
अभिनेता तन्मय जक्का या ‘शुभ श्रावणी’ मालिकेत रुद्रपताप ही भूमिका साकारणार आहे. रुद्रप्रताप इन्स्पेक्टर आहे, त्यामुळे त्याच्या डॅशिंग लूकचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. आता रुद्रप्रतापच्या येण्याने शुभ-श्रावणीच्या प्रेमाची केमिस्ट्री बदलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रुद्रप्रताप श्रावणीच्या बाबांची केसस्टडी करणार आहे.
रुद्रप्रतापच्या रुपात अभिनेता तन्मय जक्का लवकरच या मालिकेत दाखल होईल. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करत तन्मयला या नव्या भूमिकेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ‘शुभ श्रावणी’ मालिका रोज सायंकाळी ६.३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते. यामध्ये वल्लरी विराज, सुमीत विजय, आसावरी जोशी, लोकेश गुप्ते यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
