Colors Marathi Serial Mohini : ‘कलर्स मराठी’वर येत्या काही दिवसांत दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चला ऑन एअर होतेय. तर, ‘मोहिनी’ या नव्याकोऱ्या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख अन् वेळ नुकतीच ‘कलर्स मराठी’कडून जाहीर करण्यात आली आहे.
“स्वाभिमान आणि अहंकाराच्या या लढाईत नेमकं कोण जिंकणार?” मोहिनी की RK? हा अनोखा संघर्ष या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘मोहिनी’ मालिका ‘कलर्स हिंदी’वर गाजलेल्या ‘मधुबाला’ मालिकेचा रिमेक असल्याचं कमेंट्समध्ये अनेकांनी म्हटलं आहे. ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून’ ही मालिका २०१२ मध्ये प्रसारित केली जायची. या सिरियलला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता याचा रिमेक प्रेक्षकांना मोहिनीच्या रुपात ‘कलर्स मराठी’वर पाहता येईल.
‘मोहिनी’चा पहिला प्रोमो पाहूनच ही मालिका मधुबालाचा रिमेक आहे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी पोस्टवर केल्या आहेत. आता या मोहिनीला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोणती मालिका संपू शकते?
‘मोहिनी’ मालिका २३ मार्चपासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाईल. या स्लॉटला सध्या ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका प्रक्षेपित केली जाते. यामध्ये सध्या महानिर्वाणाचा भावपूर्ण अध्याय दाखवला जात आहे. त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल असं म्हटलं जात आहे. मात्र, अद्याप याबाबत ‘कलर्स मराठी’ वाहिनीने कोणतीही अपडेट शेअर केलेली नाहीये. फक्त, मोहिनी मालिका ७:३० वाजता प्रसारित होईल हे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे.
मोहिनी मालिकेत एक फ्रेश जोडी एकत्र झळकणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री अनघा ठाकूर यामध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे. तर, अनघाच्या सोबतीला या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला. याशिवाय ‘स्टार प्रवाह’च्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत सुद्धा समीरने प्रमुख भूमिका साकारली होती.

दरम्यान, मोहिनीची लॉन्च डेट जाहीर होताच या मालिकेच्या टीमवर सगळ्या कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शर्वरी जोग, प्रतीक्षा मुणगेकर, समृद्धी केळकर, महिमा म्हात्रे, हृषिकेश शेलार, अभिषेक रहाळकर या कलाकारांनी प्रोमोच्या पोस्टवर कमेंट्स करत मोहिनीच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
