Colors Marathi New Serial Mi Jinkun Ghein Sara : ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या टीआरपीत ‘बिग बॉस मराठी’मुळे गेल्या काही दिवसांत चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वीच ‘कलर्स मराठी’ने दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. यापैकी ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची नांदी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता येत्या काही दिवसांत अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका ‘कलर्स मराठी’वर येत्या १६ मार्चपासून प्रसारित करण्यात येणार आहे. ही मालिका सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित केली जाईल. महत्त्वाचं म्हणजे या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

‘मी जिंकून घेईन सारं!’ या मालिकेत भारती आचरेकर यांच्यासह मुख्य भूमिकेत झळकणार आहे लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी तांबट. यापूर्वी ती ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकली होती. याशिवाय ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’ या मालिकेत सुद्धा जान्हवीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, जान्हवी तांबट, अभिनेता अमित रेखी, संचित चौधरी, दिशा दानडे अशा लोकप्रिय कलाकारांची या मालिकेत मांदियाळी असणार आहे. तर, खलनायिकेची भूमिका साकारेल लोकप्रिय अभिनेत्री अमृता फडके. अमृताने यापूर्वी ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत काम केलं होतं.

‘मी जिंकून घेईन सारं!’ ही मालिका १६ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाईल. सध्या या स्लॉटला ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका ऑन एअर होते. या मालिकेची वेळ बदलली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण, सायंकाळी साडेसहाला प्रसारित होणारी ‘इंद्रायणी’ मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे. २१ फेब्रुवारीला ‘इंद्रायणी’ मालिकेचं शूटिंग संपलेलं आहे. मुख्य नायिका कांची शिंदेने स्वत: याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

दरम्यान, आता ‘मी जिंकून घेईन सारं!’ या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोवर तरी सर्वांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.