Colors Marathi New Serial Mohini Promo : छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसांत नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. ‘कलर्स मराठी’ने नुकतीच त्यांच्या ‘मी जिंकून घेईन सारं’ या नव्या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख जाहीर केली. या पाठोपाठ ‘कलर्स मराठी’ने प्रेक्षकांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. ‘मोहिनी’ या नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली आहे.
‘मोहिनी’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं काही दिवसांपूर्वीच ‘कलर्स मराठी’ने जाहीर केलं होतं. मात्र, तो फक्त मोहिनीचा टीझर होता. आता नुकताच या नव्याकोऱ्या सिरियलचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आता मालिकेच्या नावाप्रमाणे यात ‘मोहिनी’ची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. अखेर या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे अनघा ठाकूर. या मालिकेच्या निमित्ताने अनघा पहिल्यांदाच मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे.
तर, अनघाच्या सोबतीला या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे. ‘कलर्स मराठी’च्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला होता. यानंतर समीरने ‘स्टार प्रवाह’च्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. आता हा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता पुन्हा एकदा वाहिनीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. समीरवर मराठी कलाविश्वातील त्याच्या मित्रमंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
समीर मोहिनी मालिकेत RK ही भूमिका साकारणार आहे. मोहिनीचा स्वाभिमान विरुद्ध RK चा अहंकार… सेटवर सुरु झालेली ही कथा जेव्हा खऱ्या आयुष्याच्या पडद्यावर उतरणार, तेव्हा काय घडणार? हा रंजक प्रवास प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळेल.
‘मोहिनी’ ही मालिका ‘कलर्स हिंदी’वर गाजलेल्या ‘मधुबाला’ मालिकेचा रिमेक असल्याचं कमेंट्समध्ये अनेकांनी म्हटलं आहे. आता ही मोहिनी प्रेक्षकांना मोहिनी घालणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘कलर्स मराठी’ने अद्याप या मोहिनीच्या प्रसारणाची तारीख अन् वेळ जाहीर केलेली नाही. आता ही मालिका नेमकी कधी प्रसारित होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
