Colors Marathi New Serial : छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसांत नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याचे प्रोमो देखील संबंधित वाहिन्यांवरून शेअर करण्यात आले आहेत. आता या मालिका कधी व केव्हापासून सुरू होणार याचा उलगडा हळुहळू करण्यात येईल. रविवारी १५ फेब्रुवारीला एका नव्या कौटुंबिक मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. ही मालिका ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार आहे.

सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमुळे कलर्स मराठीचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे. अशातच वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेचं नाव आहे ‘मी जिंकून घेईन सारं!’

‘मी जिंकून घेईन सारं!’ या नव्या मालिकेची पहिली झलक नुकतीच शेअर करण्यात आली आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी तांबट प्रमुख भूमिका साकारणार आहे. यापूर्वी ती ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकली होती. सिद्धूचं भावनाच्या आधी ज्या मुलीशी ( पूर्वी ) लग्न ठरलेलं असतं, तिची भूमिका जान्हवीने साकारली होती. याशिवाय ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’ या मालिकेत सुद्धा ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. आता जान्हवी ‘मी जिंकून घेईन सारं!’मध्ये मुख्य नायिका म्हणून झळकणार आहे.

दोन अभिनेते अन् मालिकेची खलनायिका कोण आहे?

ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर सुद्धा या नव्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. याशिवाय यामध्ये दोन लोकप्रिय नायक झळकणार आहेत यापैकी एक आहे ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेता अमित रेखी आणि दुसरा नायक आहे ‘तुझी माझी जमली जोडी’ फेम अभिनेता संचित चौधरी.

‘प्रेमास रंग यावे’ फेम अभिनेत्री अमृता फडके या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारेल असं प्रोमोमधून स्पष्ट होत आहे. आता छवी आपल्या आजीला कशी साथ देणार हा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना ‘मी जिंकून घेईन सारं!’ या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळेल.

दरम्यान, आता ही नवीन मालिका केव्हा ऑन एअर होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनी या ‘मी जिंकून घेईन सारं!’ मालिकेच्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.