Colors Marathi Serial Off Air : छोट्या पडद्यावर येत्या काळात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे साहजिकच काही जुन्या मालिका सर्वांचा निरोप घेणार आहेत. अशीच एक मालिका साधारण दीड वर्षांपूर्वी ऑन एअर झाली होती. यामध्ये प्रेक्षकांना पाच जीवाभावाच्या मैत्रिणींची गोष्ट पाहायला मिळाली होती. ही लोकप्रिय मालिका आता सर्वांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने याबाबतची माहिती पोस्ट शेअर करत सर्वांना सांगितली आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीने अलीकडेच दोन नव्या मालिकांची घोषणा केली. यापैकी ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चपासून प्रदर्शित करण्यात आली. तर, याच वाहिनीची ‘मोहिनी’ मालिका येत्या २३ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे, ‘इंद्रायणी’ पाठोपाठ ‘कलर्स मराठी’वरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं नाव आहे ‘पिंगा गं पोरी पिंगा’. १७ मार्चला या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं. शेवटच्या दिवसाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर या शोमधील कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.

‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये सुरुवातीला ऐश्वर्या शेटे ( वल्लरी ), विदिशा म्हसकर ( तेजा ), शाश्वती पिंपळीकर ( प्रेरणा ), प्राजक्ता परब ( मिथिला ), आकांक्षा गाडे ( श्वेता ) अशा एकूण पाच अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका होत्या. यापैकी वल्लरीची भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या शेटेने सोशल मीडियावर ‘One Last Time’ असा फोटो शेअर करत मालिकेचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सर्वांना सांगितलं आहे.

‘पिंगा गं पोरी पिंगा’ फेम वल्लरीने या पोस्टमध्ये शूटिंगच्या शेवटच्या दिवसाची आणि तिच्या मालिकेतील घराची झलक सर्वांना दाखवली आहे. वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटेने सेटवरून एक खास सेल्फी फोटो शेअर केला आहे. यामध्ये ‘पिंगा गं पोरी पिंगा’मधील अभिनेत्रींची फोटोफ्रेम पाहायला मिळतेय. याचबरोबर स्क्रीप्टचा फोटो शेअर करत वल्लरीने ‘GoodBye Signing Off’ असं कॅप्शन दिलं आहे.

वल्लरीने शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये तिच्या सेटवरच्या घराची झलक दिसतेय. या घराच्या दाराबाहेर सौ. वल्लरी मनोज भामरे अशी नेमप्लेट लावण्यात आली आहे.

colors marathi serial off air
ऐश्वर्याची पोस्ट

‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेला गेल्या दीड वर्षात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला ही मालिका सायंकाळी ७:३० च्या स्लॉटला आणि सध्या रात्री उशिरा ११ वाजता प्रसारित केली जाते. आता २३ मार्चपासून कलर्स मराठीवर सायंकाळी ७:३० वाजता ‘मोहिनी’ ही मालिका ऑन एअर होईल.