Colors Marathi Pinga Ga Pori Pinga Serial Off Air : ‘कलर्स मराठी’ वाहिनीने नुकतीच दोन नव्या मालिकांची घोषणा केली. यापैकी ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर, ‘मोहिनी’ ही मालिका आजपासून ( २३ मार्च ) ऑन एअर होणार आहे. या दोन्ही मालिका अनुक्रमे सायंकाळी सात आणि साडेसात वाजताच्या स्लॉटला प्रसारित केल्या जातील. त्यामुळे साहजिकच एका जुन्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय आणि अन्य दोन मालिकांच्या वेळेत ‘कलर्स मराठी’कडून बदल करण्यात आला आहे.
‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेचा पहिला भाग २८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता जवळपास दीड वर्षांनी या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे. रविवारी २२ मार्चला या ‘पिंगा गं पोरी पिंगा’चा अखेरचा भाग प्रक्षेपित झाला.
या मालिकेत ऐश्वर्या शेटे ( वल्लरी ), विदिशा म्हसकर ( तेजा ), शाश्वती पिंपळीकर ( प्रेरणा ), प्राजक्ता परब ( मिथिला ), आकांक्षा गाडे ( श्वेता ) अशा एकूण पाच अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका होत्या. मालिका दीड वर्षांनी संपल्यावर या अभिनेत्रींनी भावुक पोस्ट शेअर करत चाहत्यांचा निरोप घेतला आहे.
शाश्वती पिंपळीकर लिहिते, “बुलबुल बाग! सप्टेंबर २०२४ मध्ये या वास्तूत आम्ही पहिल्यांदा पाऊल टाकलं…शाश्वती पिंपळीकर म्हणून आले….. आणि सुरू झाला ‘पिंगा गं पोरी पिंगाचा’ प्रवास…. कुठलीही वास्तू आपल्या प्रत्येक क्षणांची साक्षीदार असते, तसंच आमचं हे बुलबुल बाग इथे घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय… या वास्तूने आम्हाला हसताना, खिदळताना, भांडताना, रडताना बघितलं आणि प्रत्येक प्रसंगात तटस्थपणे आम्हाला साथ दिली. ‘पिंगा गं पोरी पिंगा’च्या पाच मैत्रिणींच्या धिंगाण्यानंतर ही वस्तू पुन्हा एका वेगळ्या Shooting साठी नटणार, पुन्हा नव्या पात्रांच्या स्वप्नांना तितक्याच तटस्थपणे उभारी देणार! २०२४ मध्ये इथे पहिलं पाऊल टाकलेली शाश्वती, या वास्तूचा निरोप घेताना मात्र प्रेरणा झालेली होती.”
या दोन मालिकांच्या वेळेत बदल
‘कलर्स मराठी’ने २३ मार्चपासून दोन मालिकांच्या वेळेत बदल केला आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिका आता रोज संध्याकाळी ६ वाजता प्रसारित केली जाईल. तर, ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता ऑन एअर होईल.
