Colors Marathi Serial Off Air : छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आकडेवारीवरून ठरवली जाते. ज्या मालिकांना चांगला टीआरपी मिळतो…त्या सिरीयल्स वर्षानुवर्षे चालू ठेवल्या जातात. पण, ज्या मालिकांना चांगला टीआरपी मिळत नाही, ज्यांना प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद नसतो अशा मालिकांना अवघ्या ४ ते ६ महिन्यांतच गाशा गुंडाळावा लागतो.

टेलिव्हिजनवरच्या अशा अनेक मालिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याची अनेक उदाहरणं यापूर्वी आपण पाहिली आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’, ‘दुर्गा’, ‘अंतरपाट’ अशा अनेक मालिकांनी टीआरपी अभावी अवघ्या काही महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता याच वाहिनीवरील आणखी एक मालिका लवकरच बंद होणार आहे.

‘कलर्स मराठी’वर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘लय आवडतेस तू मला’ ही मालिका सुरू झाली. ‘बिग बॉस मराठी’ संपल्यावर ही मालिका ऑन एअर झाली होती. यामध्ये तन्मय जक्का आणि सानिका मोजर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा अशी टॅगलाइन देत वाहिनीने या मालिकेचं प्रमोशन केलं होतं. मात्र, खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘लय आवडतेस तू मला’ ही मालिका अवघ्या ७ महिन्यांत ऑफ एअर होणार आहे. १८ मे रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाईल.

‘लय आवडतेस तू मला’ या मालिकेत तन्मय आणि सानिका हे दोन प्रमुख कलाकारा अनुक्रमे सरकार आणि सानिका या भूमिका साकारत होते. आता लवकरच ही लाडकी जोडी सर्वांचा निरोप घेईल. यापूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अंतरपाट’ या मालिकेने सुद्धा असाच प्रेक्षकांचा अचानक निरोप घेतला होता. अवघ्या काही भागांतच या मालिकेचा गाशा गुंडाळण्यात आला होता.

याशिवाय अभिनेत्री स्पृहा जोशी, सागर देशमुख, स्वप्नील परांजपे, आशय कुलकर्णी, स्वाती देवल अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ‘सुख कळले’ मालिका देखील अल्पावधीतच ऑफ एअर झाली होती. आता येत्या काळात कलर्स मराठीवर साडेनऊच्या स्लॉटला काय पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.