Bharti Singh On Online Scam : सोशल मीडियामुळे अलीकडे फसवणुकीच्या अनेक घटना वाढल्या आहेत. सेलिब्रिटींच्या नावाचा आणि प्रसिद्धीचा वापर करत अनेकांना सर्रास फसवलं जातं. कलाकार मंडळी अशा स्कॅमपासून दूर राहण्यासाठी आपल्या चाहत्यांना वेळोवेळी सावधसुद्धा करतात. असाच काहीसा प्रकार ‘लाफ्टर क्वीन’ भारती सिंगबरोबर घडला आहे.

विनोदी अभिनेत्री भारती सिंगने नुकतंच चाहत्यांना एका ऑनलाइन घोटाळ्याबाबत सावध केले. सोशल मीडियावर AI द्वारे बनवलेल्या व्हिडीओमध्ये भारतीचा आवाज वापरून बारीक होण्याच्या प्रोडक्टचं प्रमोशन केलं जात आहे. याबद्दल अभिनेत्रीला अद्याप काहीच माहिती नव्हती. मात्र, याबद्दल कळताच तिनं चाहत्यांना सावध राहण्यास सांगितलं आहे.

News 18 च्या वृत्तानुसार, भारतीने आपल्या चाहत्यांना माहिती दिली की, काही लोक तिचा आवाज वापरुन AI ने तयार केलेले व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओमध्ये जणू भारतीच या प्रोडक्टचं प्रमोशन करत आहे, असं वाटत आहे. पण हे खोटं असल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे.

“माझ्या नावाने फसवणूक सुरू : भारती सिंगने केलं सावध

भारती म्हणाली, “माझ्या नावाने फसवणूक सुरू आहे. दररोज सकाळी लोक मला मेसेज पाठवतात आणि विचारतात, ‘भारती जी, हे खरं आहे का? आपण हे वापरलं आहे का? या कंपनीची माहिती आहे का?’”

ती पुढे म्हणाली, “मी तुम्हाला सांगू इच्छिते की मला या कंपनीबद्दल काहीच माहिती नाही. माझी परवानगी न घेता, माझं नाव आणि आवाज वापरून हे प्रोडक्ट विकण्याचा प्रकार सुरू आहे. मला याबाबत काहीच माहिती नव्हती. लोकांनी व्हिडीओ पाठवायला सुरुवात केली, त्यामुळेच मला याबद्दल कळलं.”

भारतीने स्पष्ट केले की, जाहिरातींमध्ये ऐकू येणारा आवाज तिचा नाही आणि चाहत्यांनी या AIने केलेल्या व्हिडीओवर अजिबात विश्वास ठेवू नये.

“मला माहीत नाही की हे लोक कोण आहेत” : भारती सिंग

पुढे ती म्हणाली, “हा एक स्कॅम आहे. कृपया हे प्रोडक्ट विकत घेऊ नका. माझा चेहरा असू शकतो, पण आवाज माझा नाही. अगदी माझ्या आईनेही मला व्हिडीओ पाठवून विचारलं, ‘हे खरं आहे का?’ पण हे खोटं आहे. मला माहीत नाही की हे लोक कोण आहेत.” दरम्यान, भारतीने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आणि अशा फसवणूक करणाऱ्या जाहिरातींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

दरम्यान, भारती सिंग ही हिंदी टेलिव्हिजन विश्वातली लोकप्रिय विनोदी अभिनेत्री आहे. तिनं आजवर विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रीय असते. युट्यूबवर व्लॉग व्हिडीओद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.