क्रिकेटर ते अभिनेता असा प्रवास करणाऱ्या सलिल अंकोलाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. क्रिकेट करिअर संपल्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या आणि मग सलिलने अभिनयाचा मार्ग निवडला. सलिलने कहता है दिल, कोरा कागज, विक्रल और गब्राल या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. पण सलिलला दारूचं व्यसन जडलं. १९९७ मध्ये क्रिकेट खेळणं सोडल्यानंतर दारू पिण्यास सुरुवात केली, असं सलिलने स्वतः सांगितलं.
सलिल अंकोला विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मी किती दारू प्यायलो हे मला आठवत नाही. वर्षानुवर्षे मी खूप दारू प्यायलो.” सलिलने १९९९-२०११ या काळात क्रिकेट पाहणं बंद केलं होतं. आयुष्यातील सर्वात वाईट काळात किती दारू प्यायलास असं विचारल्यावर तो म्हणाला, “जर मी २४ तास जागा होतो, तर मी २४ तास दारू प्यायलो, कारण ती माझी पळवाट होती.”
दारू सोडण्याचा प्रयत्न केला पण…
मित्रांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी दारू सोडण्यास मदत केली का? असं विचारल्यावर सलिल म्हणाला, “त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर ते फक्त पिणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतं. कदाचित तेव्हा मी थांबायला तयार नव्हतो.” सलिलने सांगितलं की मागील काही वर्षांत तो अनेक पुनर्वसन केंद्रांमध्ये गेला आणि दारू सोडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. “मी अनेक पुनर्वसन केंद्रांमध्ये गेलो, अनेक वेळा दारू सोडण्याचा प्रयत्न केला, पण इच्छा असूनही ते शक्य झालं नाही,” असं त्याने नमूद केलं.
दारू पिणं ही सवय नाही, आजार आहे – सलिल अंकोला
सलिलने २०११ च्या क्रिकेट वर्ल्डकपची सेमी फायनल मॅच पुनर्वसन केंद्रात पहिली होती. दारूच्या व्यसनाबद्दल बोलताना सलिल म्हणाला, “लोकांना वाटतं की ही एक सवय आहे आणि लोक ते मनोरंजनासाठी करतात. पण ही सवय नाही, हा एक आजार आहे.” तो पुढे म्हणाला, “देवाची कृपा आहे. नाहीतर आता मी जिवंत नसतो. मी २०१४ मध्येच मेलो असतो. मी आयसीसीयूमध्ये होतो, ३ वेळा मी मरणाच्या दारातून परत आलो.” मद्यपानामुळे सलिलला तब्बल १२ वेळा आयसीसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
दुसऱ्या बायकोला भेटल्यावर या व्यसनापासून सुटका होण्यास मदत झाली, असं सलिल अंकोलाने नमूद केलं. तो तिला फेसबूकवर भेटला. ती डॉक्टर होती. तिने सलिलची परिस्थिती समजून घेतली. त्याच्या शरीराची, मनाची अवस्था समजून घेतली आणि या व्यसनातून बाहेर पडण्यास मदत केली. नंतर सलिल पुन्हा अभिनयात परत आला. मालिका व चित्रपट करू लागला. तो शेवटचा ‘पमबट्टम’ या तमिळ चित्रपटात झळकला होता.
