scorecardresearch

दोन वडापाव आणि पुस्तकातील एका ओळीमुळे बदललं अनुप सोनीचं आयुष्य; मुलाखतीदरम्यान केला खुलासा

अनुप सोनीने त्या दिवशी मुंबई सोडून दिल्लीला परत जायचं ठरवलं होतं

दोन वडापाव आणि पुस्तकातील एका ओळीमुळे बदललं अनुप सोनीचं आयुष्य; मुलाखतीदरम्यान केला खुलासा
अभिनेता अनुप सोनी

आपल्याकडे टेलिव्हिजनवर जेवढी क्रेझ ‘सीआयडी’सारख्या कार्यक्रमाची होती, तेवढीच क्रेझ ‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमाची आहे. आजही या कार्यक्रमातील बरेच जुने एपिसोड लोक युट्यूबवर पाहतात. या कार्यक्रमाणे अभिनेता अनुप सोनी याला घराघरात ओळख मिळाली. ‘सावधान रहिये सतर्क रहिये’ हा डायलॉग डोळे बंद करून ऐकला तरी लोकांच्या डोळ्यासमोर अनुप सोनीचा चेहेरा येतो. नाटक, दूरदर्शनवर काम करणाऱ्या अनुप सोनीचं नाव लोकांपर्यंत पोहोचलं ते ‘क्राइम पेट्रोल’मुळे.

‘एनएसडी’मधून अभिनयाचं प्रशिक्षण घेऊन अनुप सोनी जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्यालाही प्रचंड स्ट्रगल करावं लागलं. त्याच्या आयुष्यातील खडतर दिवसांपैकी एक अनुभव त्याने शेअर केला आहे. ‘द बॉम्बे जर्नी’ या युट्यूबवरील कार्यक्रमात अनुप सोनीने त्याच्या मुंबईतील स्ट्रगलबद्दल खुलासा केला आहे. त्याच्या आयुष्यात एक दिवस असा आला होता जेव्हा त्याने मुंबई सोडून दिल्लीला परत जायचं ठरवलं होतं. त्या दिवसाची आठवण अनुपने या मुलाखतीमध्ये सांगितली आहे.

आणखी वाचा : “हिंदी चित्रपटातील दिखावा…” अनुपम खेर यांनी सांगितलं प्रेक्षक आणि बॉलिवूडमध्ये दरी निर्माण होण्यामागचं कारण

याविषयी बोलताना अनुप म्हणाला, “त्याकाळात मी माझ्या नाटकात काम केल्याचा अनुभव आणि नाटकातील काही फोटोग्राफ याचा एक फोल्डर केला होता, आणि तो फोल्डर घेऊन मी मुंबईत कामासाठी फिरायचो. एक दिवस करी रोडच्या परिसरातून जाताना अचानक पाऊस सुरू झाला आणि मी बाजूला आडोसा शोधायला धावपळ केली. त्या नादात माझ्या हातातील पिशवी फाटली आणि माझं फोल्डर आणि माझे ते फोटो सगळं पाण्यात भिजलं काही फोटो वाहून गेले. तेव्हा मी खूप निराश झालो आणि त्यादिवशी मी ठरवलं की बास! आता आणखी या शहरात राहायचं नाही आणि मी घरी परत जायचं निश्चित केलं.”

यानंतर अनुपचा हा निर्णय एका पुस्तकातील ओळीमुळे बदलला. याविषयी बोलताना अनुप म्हणाला, “तेव्हा मी घरी गेलो आणि झोपायचा प्रयत्न केला, पण झोप काही येत नव्हती. त्या काळात मला तशीही झोप उशिरा येत असल्याने मी २ वडापाव बांधून घरी आणायचो, तेव्हा ५ रुपयांत २ वडापाव मिळायचे. आणि मग मी रात्री उशिरा भूक लागली की वडापाव खायचो आणि पुस्तक वाचायचो. तेव्हा माझ्याकडे काही प्रेरणादायी पुस्तकं होती. त्यातलं एक पुस्तक मी चाळत असताना त्यातील एका ओळीने माझे डोळे उघडले. ती ओळ माझ्या तेव्हाच्या मनस्थितिशी अगदी मिळती जुळती होती, ती ओळ अशी होती की, ‘आयुष्यात जर एखादी मोठी गोष्ट मिळवायची असेल तर सुख सुविधा आणि आरामदायी गोष्टींचा त्याग करावा लागेल.’ ही ओळ वाचून मला समजलं मी कुठे चुकत होतो. मी माझ्या आईच्या हातच्या जेवणाचा, सुरक्षित नोकरीचा विचार करत होतो, त्याक्षणी मी माझा विचार बदलला आणि ठरवलं की आता मुंबई सोडायची नाही.”

त्यानंतर मात्र अनुपने मागे वळून पाहिलं नाही. चित्रपट आणि टेलिव्हीजनमध्ये त्याने बरंच काम केलं. ‘फिजा’, ‘गंगाजल’सारख्या चित्रपटात अनुपच्या कामाची प्रशंसा झाली. याबरोबरच त्याने ‘सीआयडी’ आणि ‘आहट’सारख्या मालिकांमध्येही काम केलं. यानंतर आलेल्या ‘क्राईम पेट्रोल’ने मात्र अनुपचं आयुष्य बदलून टाकलं. आजवर बऱ्याच लोकांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक म्हणून काम केलं, पण अनुप सोनीला जितकी लोकप्रियता मिळाली तेवढी कुणालाच मिळालेली नाही. आता अनुप सोनी नेटफ्लिक्सच्या ‘ खाकी’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 10:55 IST

संबंधित बातम्या