Dashavatar Movie World Television Premiere : दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दशावतार’ सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ‘दशावतार’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. या सिनेमाने जवळपास २८.४० कोटींहून अधिक कमाई केली आहे. देवभूमी मानल्या जाणाऱ्या कोकणातील राखणदाराच्या भोवती या सिनेमाची संपूर्ण कथा फिरते. ‘दशावतार’ पाहण्यासाठी जे लोक चित्रपटगृहात जाऊ शकले नाहीत अशा सगळ्या प्रेक्षकांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट आता घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे. या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केव्हा व कधी असेल जाणून घेऊयात…
कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार या ‘दशावतार’ सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाला. वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या सिनेमात बाबुली मिस्त्रीची भूमिका साकारली आहे. कोकणात जवळपास दोन महिने या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. संपूर्ण चित्रपटामध्ये अप्रतिम सिनेमॅटोग्राफीची जादू सिनेप्रेमींना अनुभवायला मिळाली.
आता ‘दशावतार’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या २१ डिसेंबरला होणार आहे. “आता घराघरात गाजणार आणि गर्जणार ‘मराठी चित्रपटसृष्टीचा राखणदार’ – दशावतार” असं कॅप्शन देत ‘झी मराठी’ने ही पोस्ट शेअर केली आहे. २१ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता ‘दशावतार’ सिनेमा प्रेक्षकांना ‘झी मराठी’वर पाहता येईल.
‘दशावतार’ टेलिव्हिजनवर केव्हा पाहायला मिळेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची घोषणा झाल्यावर चाहत्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आम्ही खूपच उत्सुक आहोत” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर प्रेक्षकांनी दिल्या आहे.
दरम्यान, ‘दशावतार’ या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, आरती वडगबाळकर या कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
