‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा कार्यक्रम हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. जवळपास दोन दशाकापासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लोकप्रिय कलाकारांची तगडी फौज असलेला हा शो आणि यातील कलाकार नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच आता सीआयडी फेम लोकप्रिय अभिनेता दयानंद शेट्टीने याबद्दल भाष्य केल्याची चर्चा सुरू आहे.
‘सीआयडी’ मालिकेत दया ही भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता दयानंद शेट्टीने नुकत्याच एका मुलाखतीत एका गाजलेल्या कॉमेडी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक वातावरणाबाबत भाष्य केलं. जरी त्यांने कोणत्याही मालिकेचं नाव घेतलं नसलं, तरी त्याच्या वक्तव्यानंतर अनेकांनी तो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेबद्दलच बोलत असल्याचा अंदाज लावला आहे.
दयानंद शेट्टीने सांगितली ‘तारक मेहता…’च्या सेटवरची सत्यस्थिती
कोणत्याही मालिकेचं नाव न घेता दयानंद शेट्टी म्हणाला, “एक खूप लोकप्रिय कॉमेडी मालिका आहे, पण मी तिचं नाव घेणार नाही. आपल्याला असं वाटतं की, कॉमेडी मालिका असल्यामुळे तिथल्या कलाकारांची विनोदबुद्धीही तितकाच भन्नाट असेल. ते कलाकार सेटवरही कायम हसत-खेळत आणि विनोद करत असतील.” आपला अनुभव सांगताना दयानंद शेट्टी पुढे म्हणाला, “मी त्यांच्याबरोबर काम करत होतो. मला वाटलं होतं की सेटवर कायम हसतं-खेळतं वातावरण असेल. पण प्रत्यक्षात चित्र अगदी वेगळंच होतं. जसा सीन कट व्हायचा, तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव असायचे. कोणी कोणाकडे पाहत नव्हतं, एकमेकांशी बोलतही नव्हतं. सगळे त्यांच्या खोलीत जायचे. पडद्यावर कॉमेडी करणारे कलाकार पडद्यामागे मात्र पूर्णपणे वेगळेच दिसायचे.”
‘सीआयडी’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या दोन्ही मालिकांच्या टीमने अनेक भागांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे दयानंद शेट्टीच्या वक्तव्याचा संदर्भ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेशीच असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे. दयानंद शेट्टी पुढे म्हणाला की, ज्या कॉमेडी मालिकेच्या सेटवर तो गेला होता तिथलं वातावरण काहीसं गंभीर होतं. मात्र ‘सीआयडी’च्या सेटवरील वातावरण याच्या अगदी उलट होतं.
The dark reality of Taarak Mehta show . No doubt, many senior actors are leaving the show despite being paid well. pic.twitter.com/7Sanbd19ZO
— Byomkesh (@byomkesbakshy) July 31, 2026
तो म्हणाला, “आमची मालिका गुन्हेगारी आणि हत्यांसारख्या गंभीर विषयांवर आधारित होती. तरीही सेटवर आम्ही सतत हसत-खेळत असायचो. एकमेकांची खिल्ली उडवणं, मस्करी करणं याची एकही संधी आम्ही सोडत नव्हतो.”
