Anup Belwalkar Fan Moment with Ankush Chaudhari: आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याचा, त्यांच्याबरोबर बोलण्याचा आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा आनंदच वेगळा असतो. कलाकारही इतर कलाकारांचे चाहते असतात. आता असाच एक अनुभव दीप ज्योती फेम अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘दीप-ज्योती’ या मालिकेत स्वराज ही भूमिका अभिनेता अनुप बेलवलकरने साकारली आहे. अनुपने नुकतीच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर अभिनेता अंकुश चौधरी दिसत आहे.

“समोर उभ्या असलेल्या सुपरस्टारला…”

हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “अंकुश चौधरी. समोर उभ्या असलेल्या सुपरस्टारला कुतुहलाने बघत होतो. त्याने हात मिळवला आणि मी त्याला बघत होतो. ‘ये गो ये ये मैना पिंजरा बनाया सोनेका’, ‘वाऱ्यावरती गंध पसरला’ ,’आभास हा’, ‘ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय’, ‘मन धागा धागा जोडते नवा’,’गुरू’, ‘देवा’ आणि अगदी ‘बहरला हा मधुमास नवा’, सगळी गाणी डोळ्यासमोरून येत-जात होती. परफेक्ट फॅन मुमेंट (Fan Moment)होता.”

“अंकुश चौधरीला पाहिल्यानंतर…”

पुढे त्याने लिहिले, “गावी जेव्हा मोठे मोठे कलाकार यायचे, तेव्हा त्यांना बघायला जायची जी एक उत्सुकता असायची ,त्यांच्याबरोबर फोटो काढायला मिळायला हवा,खरं तर त्यावेळी आपण सही घ्यायचो आणि ती जर मिळाली तर सगळ्यांना दाखवत किंवा सगळ्यांना मिरवून दाखवायचं, बघितलास काय? असं म्हणायचो. अंकुश चौधरीला पाहिल्यानंतर माझंही असंच झालं.”

त्याने असेही लिहिले, “रात्री आई-बहिणीचा व्हिडिओ कॉल असतोच. अंकुश चौधरी समोर असतानाही त्यांचा फोन आला. मी त्यांना म्हणालो की अंकुश चौधरीबरोबर भेट झाली. तुम्ही बघणार आहात का? थांबा दाखवतो म्हणून मी २-३ वेळा अंकुश दादाच्या समोरून कॅमेरा घेऊन फिरलो, म्हटलं दिसला का? आई म्हणाली फोटो काढला नाही का? मी म्हणालो की नाही. त्यांना पण भारी वाटलं.”

अभिनेत्याने असेही लिहिले, “बोलायची इच्छा होती. पण, जायचं धाडस होत नव्हतं. शेवटी मनात थोडी भीती असतेच. मी ओमप्रकाशला म्हटलं मला अंकुश दादाबरोबर फोटो काढायचा आहे. तो म्हणाला काढूया आणि शेवटी निघता निघता ओमप्रकाशमुळे जाऊन भेटलोच आणि फोटो सुद्धा काढला. नंतर थोड्या गप्पा सुद्धा झाल्या. मग अंकुश दादाने मस्त मिठी मारली. संपला विषय. कालचा दिवस सत्कारणी लागला. आई- बहिणीला आणि माझ्या खास ग्रुप मध्ये फोटो पाठवला अर्थात मिरवायलाचय आणि मनात म्हटलं बघितला का, अंकुश चौधरीबरोबरचा फोटो?”, असे म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, दीप-ज्योती मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.