Deepa Parab reveals why she took break: दीपा परब लवकरच ‘सुना येती घरा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे. दीपा परब या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. उमावती असे तिच्या पात्राचे नाव आहे. ब्रेकनंतर ती या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

याआधी दीपा परब झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत दिसली होती. ही मालिका २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने जवळजवळ दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. २०२४ ला मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर दीपा कोणत्याही मालिकेत काम करताना दिसली नाही. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे हे जाणून घेऊ…

दीपा परबने मालिकांतून ब्रेक का घेतला होता?

दीपा परबने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मी थोडा ब्रेक घेतला, कारण स्वत:चा वेळ घेणे गरजेचे असते. तुम्हाला जर नव्याने सुरुवात करायची असेल तर तुमचं डोकं, मनही तितकं ताजेतवाने असावं लागतं. दरम्यानच्या काळात मी एका चित्रपटातही काम केलं. ते काम करताना मजा आली. काही गोष्टी आहेत, ज्या लवकरच प्रेक्षकांसमोर येतील. पण, टीव्हीवर काम करत नव्हते तर टीव्हीवर काम करावं असं वाटत होतं. त्यांनी ‘सुना येती घरा’ मालिकेतील भूमिकेसाठी मला विचारलं गेलं, त्याचं वाचन झालं. त्यानंतर या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेत भूमिका साकारण्यासाठी होकार दिला”, असे सांगत दीपा असेही म्हणाली की मला चांगली भूमिका मिळाली, लोकांना उमा हे पात्र आवडेल.

साताऱ्याची भाषा शिकण्याबद्दल दीपा परब काय म्हणाली?

भूमिकेसाठी साताऱ्याची भाषा शिकण्याबद्दल दीपा म्हणाली, “मी कोकणातली आहे. आमच्या सेटवर सागर म्हणून क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत, ते सातारचे आहेत, त्यामुळे भाषेचा हेल कसा असतो, कसं बोलायचं हे त्यांच्याकडून शिकता येतं. माझ्या आयुष्यात ही गोष्ट खूप मोठी आहे की मी एका वेगळ्या भाषेवर काम करत आहे. ते आव्हानात्मक आहे, पण काम करायला मजा येत आहे, मी आनंदी आहे.”

याच मुलाखतीत अशोक शिंदे व शर्मिष्ठा राऊत यांच्याबरोबर काम करण्याबद्दलही अभिनेत्रीने वक्तव्य केले. दरम्यान, ‘सुना येती घरा’ ही मालिका १५ जून २०२६ ला स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. आता या मालिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, मालिकेत काय ट्विस्ट पाहायला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.