Deepa Parab On Ankush Chaudhari: अभिनेत्री दीपा परब ‘सुना येती घरा’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दीपाबरोबरच,या मालिकेत अशोक शिंदे, शर्मिष्ठा राऊत महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

दीपा परबने काही दिवसांपूर्वी राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबद्दल, तिच्या खासगी आयुष्याबद्दल, तिने का ब्रेक घेतला होता, याबद्दल वक्तव्य केले. याबरोबरच, पती अंकुश चौधरीबद्दलही तिने वक्तव्य केले. ती नेमकं काय म्हणाली, याबद्दल जाणून घेऊ…

“तो सगळ्यांचा खूप…”

दीपा अंकुशबद्दल म्हणाली, “तो सगळ्यांचा खूप चांगला मित्र आहे. आम्ही दोघांनीही एकमेकांचा अवकाश जपतो. मला जास्त बाहेर जायला आवडत नाही. मला माझ्या माझ्यात राहायला थोडं आवडतं. त्याने बाहेरच चल म्हणून कधी माझ्यावर दबाव आणला नाही. त्यालाही माहित आहे की मी कशी आहे, मलाही माहितेय की तो कसा आहे.”

तुम्ही एकमेकांना करिअरबद्दल सल्ले देता का? याबद्दल दीपा म्हणाली, “हो. नवरा-बायको म्हणून त्या गोष्टी बोलल्या जातात. आम्ही नवरा बायको होण्या अगोदरसुद्धा एकमेकांचे चांगले मित्र होतो. अंकुशबद्दल असं बोललं जातं की तो खूप चांगला सल्लागार आहे. तो मला हक्काने सांगतो. मला तो म्हणतो की बघ तू ठरव, तुला काय वाटतं. पण, मला असं वाटतं. त्याचा हा गुण वाखाणण्यासारखा आहे.”

दीपा परबने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती म्हणाली, “मी थोडा ब्रेक घेतला, कारण स्वत:चा वेळ घेणे गरजेचे असते. तुम्हाला जर नव्याने सुरुवात करायची असेल तर तुमचं डोकं, मनही तितकं ताजेतवाने असावं लागतं. दरम्यानच्या काळात मी एका चित्रपटातही काम केलं. ते काम करताना मजा आली. काही गोष्टी आहेत, ज्या लवकरच प्रेक्षकांसमोर येतील. पण, टीव्हीवर काम करत नव्हते तर टीव्हीवर काम करावं असं वाटत होतं. त्यांनी ‘सुना येती घरा’ मालिकेतील भूमिकेसाठी मला विचारलं गेलं, त्याचं वाचन झालं. त्यानंतर या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेत भूमिका साकारण्यासाठी होकार दिला”, असे सांगत दीपा असेही म्हणाली की मला चांगली भूमिका मिळाली, लोकांना उमा हे पात्र आवडेल.

दरम्यान, दीपाची नवीन भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.