Deepali sayed Shared A Video : अभिनेत्री दिपाली सय्यद सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात ती टॉप पाच स्पर्धकांपैकी एक होती. परंतु, ग्रँड फिनालेमध्ये अभिनेत्री अंतिम फेरीतून बाहेर झाली. दीपाली पूर्ण सीझन चर्चेत होती. अशातच आता घरी गेल्यानंतर तिचं कुटुंबीयांनी स्वागत केलं असून १०० दिवसांनंतर घरी गेल्याच्या निमित्ताने आनंद व्यक्त केला आहे.

दिपाली सय्यद ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा तिच्या कुटुंबीयांबद्दल बोलताना दिसली आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर आल्यानंतर आणि १०० दिवस कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे आता त्यांना पाहिल्यानंतर दिपालीला प्रचंड आनंद झाल्याचं तिने शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. तिच्या घरच्यांनी तिचं जंगी स्वागत केलं. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

१०० दिवसांनंतर घरी गेल्यानंतर दिपालीने व्यक्त केला आनंद

दिपालीने कुटुंबीयांबरोबरचा व्हिडीओ शेअर करत त्याला छान कॅप्शन दिली आहे. यामधून तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे. दिपाली यामधून म्हणाली, “शंभर दिवस… घरापासून आणि स्वतःच्या लोकांपासून लांब राहणं किती कठीण असतं, हे या प्रवासाने शिकवलं. तो मानसिक ताण, ते टास्क आणि प्रत्येक क्षणाला होणारी घरची ओढ… हे सगळं आज एका क्षणात विरघळून गेलं. उंबरठ्यावर पाऊल ठेवताच घरच्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं. हा प्रवास खडतर होता पण, तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी तो पूर्ण करू शकली”

दिपालीचं कुटुंबीयांनी औक्षण करत स्वागत केलं. या व्हिडीओमध्ये दिपालीच्या मदतनीसला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिपाली १०० दिवसांनंतर घरी आल्यामुळे तिची मदतनीस भावुक झाली आहे. दिपालीसाठी ‘बिग बॉस’चा एपिसोड तिच्या घरचे दररोज पाहायचे. असं त्यांनी या व्हिडीओतून सांगितलं आहे.

अभिनेत्री ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिच्या भाचीने बाळाला जन्म दिल्याने ती आता आजी झाली आहे. पण, ‘बिग बॉस’च्या घरात असताना दिपालीच्या आयुष्यात एक दु:खद घटनासुद्धा घडली. तिच्या सासूचं निधन झालं. ‘बिग बॉस’च्या घरात कुटुंबीय भेटायला आलेले असताना तिच्या पतीने ही माहिती तिला दिली होती. दिपाली तिच्या सासूबाईंच्या खूप जवळ होती असंसुद्धा त्यांनी एका मुलाखतीमधून सांगितलं होतं.