बिग बॉस मराठीच्या टॉप ५ राकेश बापट, तन्वी कोलते, विशाल कोटियन, अनुश्री माने व दिपाली सय्यद या स्पर्धकांपैकी आता टॉप ३ उरले आहेत. दिपाली सय्यद १०० दिवसांच्या प्रवासानंतर पाचव्या क्रमांकावर एलिमिनेट झाली. तर अनुश्री माने चौथ्या क्रमांकावर बाद झाली. फिनालेतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे रितेश देशमुखने पैसे घेऊन स्वतःला एलिमिनेट करण्याची ऑफर या पाच स्पर्धकांना दिली होती, पण सर्वांनीच नकार दिला. अखेर कमी मतांच्या आधारे ५ व्या क्रमांकावर बाद होणाऱ्या स्पर्धकाचं नाव रितेश देशमुखने जाहीर केलं. दिपाली सय्यद घराबाहेर पडली, त्यानंतर नेटकऱ्यांनी तिचा निर्णय व एलिमिनेशन यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

झालं असं की टॉप ५ पैकी टॉप ४ निवडायचे होते. त्यामुळे पाचही स्पर्धकांना होस्ट रितेश देशमुखने एक ऑफर दिली. बझर वाजवून पैशांची बॅग घेऊन बाहेर पडायचं, अशी ती ऑफर होती. आधी ३ लाख रुपये, नंतर ४ लाख रुपये आणि शेवटी ५ लाख रुपयांची ऑफर रितेश देशमुखने दिली. पण पाचही जणांनी ती नाकारली. अखेर दिपाली सय्यद पाचव्या क्रमांकावर बाद झाली.

कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिपाली सय्यदचा निर्णय व एलिमिनेशन यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘उत्तम प्रवास’, ‘दिपाली खूप चांगलं खेळली’, ‘दिपाली तू बेस्ट आहेस’, ‘आता तुला टीव्हीवर पाहता येणार नाही, ‘५ लाख घ्यायला पाहिजे होते,’ ‘दीपाली ताई छान खेळला तुम्ही, पण? घ्यायला पाहिजे होते सगळे घ्या म्हणत होते,’ ‘पैसे घ्यायला हवे होते,’ ‘५ लाख मिळाले असते पण मोठी चूक केली,’ ‘आपलेच गद्दार निघाले आता तरी समज, बाहेर आल्यावर आता तरी त्यांची बाजू नको घेऊस,’ अशा कमेंट्स या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. एकूणच कमेंट्स पाहता प्रेक्षकांना दिपालीचा हा निर्णय फारसा पटला नाही.

दरम्यान, बिग बॉस मराठी सीझन ६ चा प्रवास दिपाली सय्यदसाठी चढ-उतारांनी भरलेला राहिला. अनेकांशी वाद झाले, भांडणं झाली, त्याचबरोबर ती घरात असताना तिच्या सासूबाईंचं निधन झालं. त्यामुळे ती त्यांना शेवटचं पाहूही शकली नाही.