Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed First Post after Elimination : बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले दणक्यात सुरू आहे. राकेश बापट, तन्वी कोलते, विशाल कोटियन, अनुश्री माने व दिपाली सय्यद हे टॉप ५ स्पर्धक होते. यापैकी दिपाली सय्यद पाचव्या क्रमांकावर एलिमिनेट झाली. ट्रॉफीच्या इतक्या जवळ येऊन दिपालीची विजेती व्हायची संधी हुकली. बिग बॉसच्या घरातून बाद होताच तिने पहिली पोस्ट केली आहे.
रितेश देशमुखने टॉप ५ स्पर्धकांना स्वतःला एलिमिनेट करून पैसे घेण्याची संधी दिली होती. आधी ती रक्कम तीन लाख होती, नंतर वाढवून रितेशने ती ४ लाख केली आणि नंतर ती पाच लाख केली. पण तरीही पाचही स्पर्धकांनी पैसे घेण्यास नकार दिला. या सीझनमधील इतर स्पर्धकांनी दिपाली सय्यदने एलिमिनेशनमध्ये पैसे घेण्याचा सल्ला दिला, मात्र दिपाली तिच्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी रितेश देशमुखला जो सदस्य कमी मतांमुळे पाचव्या क्रमांकावर बाद झाला, ते नाव घ्यावं लागली आणि ते नाव दिपाली सय्यदचं होतं.
पाहा दिपाली सय्यदची पोस्ट
बिग बॉस मराठीतून बाहेर आल्यावर दिपाली सय्यदने पोस्ट केली आहे. “टॉप ५’ पर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी केवळ एक खेळ नव्हता, तर ते माझ्या आयुष्यातील एक मोठं स्वप्न होतं. Thank you ‘बिग बॉस’ मला ही संधी दिल्याबद्दल आणि स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दिल्याबद्दल!
माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, तुमच्या अफाट प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच मी इथवर पोहोचू शकले. तुम्ही दिलेला प्रत्येक वोट आणि दाखवलेला विश्वास हीच माझी खरी ट्रॉफी आहे. माझ्या पाठीशी खंबीरपणे सर्व उभे राहिले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार.
प्रवास संपला असला तरी या आठवणी कायम काळजात राहतील. हे प्रेम असंच कायम राहू द्या!” अशी पोस्ट दिपाली सय्यदने केली आहे.
दिपाली सय्यदच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दिपालीला खूप चांगली खेळलीस, तुझा प्रवास उत्तम होता, आम्हाला तुझा प्रवास खूप आवडला, आता तुला टीव्हीवर बघता येणार नाही, अशा कमेंट्स दिपाली सय्यदच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, दिपाली सय्यदसाठी बिग बॉस मराठी ६ चा हा प्रवास खूप भावनिक राहिला. कारण दिपाली बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर काही दिवसांनीच तिच्या सासूबाईंचे निधन झाले. मात्र याबद्दल तिला आधी सांगितलं नव्हतं. फॅमिली वीकमध्ये तिला याबद्दल समजलं. त्यामुळे सासूबाईंच्या इच्छेप्रमाणे शेवटपर्यंत या शोमध्ये राहणं हिच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, असं म्हणत दिपालीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
