Ramayan Fame Deepika Chikhalia Daughter Juhi Wedding: ९० च्या दशकात रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia) सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहेत. दीपिका यांची लाडकी लेक जुही चिखलिया (Juhi Chikhalia) नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. या लग्नसोहळ्याचे सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून जुहीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दूरदर्शनवरील रामायणमध्ये माता सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलियांच्या घरी एक आनंद सोहळा पार पडला. दीपिकाची मुलगी जुही चिखलिया हिचं लग्न झालं आहे. दीपिका चिखलियांनी मुलीच्या लग्नातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या मुलीच्या लग्नाची झलक पाहायला मिळत आहे.
जुही व दीपिका यांच्या लूकची होतेय चर्चा
दीपिका चिखलियांची मुलगी जुहीने लग्नासाठी खास बेज रंगाचा लेहेंगा निवडला होता. जुहीच्या लग्नात सर्वजण खूप आनंदी होते. तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद व उत्साह स्पष्ट दिसतोय. दीपिका यांनी मुलीच्या लग्नासाठी खास लूक केला होता. त्यांनी सिल्क साडीवर लाल मखमली दुपट्टा घेतला होता. दीपिका चिखलियांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाच्या इतर विधींची झलक शेअर केली आहे. जुहीच्या लग्नाच्या हळदी व मेहेंदी समारंभात तिच्या कुटुंबाने धमाल केली. दीपिका व त्यांच्या पतीने लेकीबरोबर काही रील्सदेखील तयार केले. फोटो व व्हिडीओ पाहून जुहीचं लग्न एखाद्या रिसॉर्टमध्ये झालं, असं दिसतंय.
पाहा व्हिडीओ-
दीपिका चिखलिया यांना आहेत दोन मुली
दीपिका चिखलियांनी १९९१ मध्ये उद्योगपती हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला निधी आणि जुही या दोन मुली आहेत. दीपिकाच्या दोन्ही मुली लाइमलाइटपासून दूर राहतात. त्या फिल्म इंडस्ट्रीत आल्या नाहीत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, निधी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, तर जुही तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतेय.
दीपिका चिखलियांचे करिअर
दीपिका चिखलिया यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात १९८३ मध्ये ‘सुन मेरी लैला’ या चित्रपटातून केली होती. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि १४ व्या वर्षापासूनच त्यांनी जाहिरातींमध्ये काम करायला सुरुवात केली. रामानंद सागर यांच्या १९८७ मधील गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी ‘सीता’ची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्या घराघरात लोकप्रिय झाल्या आणि त्यांना मोठी ओळख मिळाली. लग्नानंतर त्यांनी अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता आणि पतीच्या व्यवसायात मदत करत होत्या. त्यानंतर पुन्हा त्या अभिनयात परतल्या.
दीपिका चिखलियांनी हिंदीसह मराठी, गुजराती, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि तेलुगु अशा विविध भाषांमधील चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. दीपिका आपल्या कामाच्या बाबतीत खूप सिलेक्टीव्ह आहेत. त्यांना जेव्हा मनापासून भूमिका आवडते, तेव्हाच त्या ती स्वीकारतात. ‘विक्रम और बेताल’ (मालिका), ‘पत्थर’, ‘घर संसार’, ‘खुदाई’, ‘बाला’ यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
