Deepti Lele Diet Plan : अनेक कलाकार मंडळी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि स्क्रीनवर छान दिसण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. त्यासाठी ते व्यायाम, डाएट या गोष्टींकडे नियमीतपणे लक्ष देतात. काही कलाकार मंडळी अनेकदा याबद्दलची माहिती मुलाखती किंवा सोशल मीडियामार्फतही शेअर करत असतात. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती लेलेनेसुद्धा तिच्या डाएटबद्दल सांगितलं आहे.

अभिनेत्री व अभिनेते फिटनेससाठी कोणत्या वेगळ्या गोष्टी करतात आणि ते स्वत:ला कसं फिट ठेवतात याबद्दल अनेक चाहत्यांना उत्सुकता असते. अशातच आता दीप्ती लेलेने एका मुलाखतीत तिचा डाएट कसा असतो, ती काय खाते, वजन घटवण्यासाठी काय करते याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणालीये आणि तिने काय टिप्स दिल्या आहेत याबद्दल जाणून घेऊयात…

दीप्ती नाश्त्याला खाते ‘हे’ पदार्थ

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत दीप्तीने तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल सांगितलं आहे. दीप्तीने ती नाश्त्याला काय खाते, दुपारच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश असतो आणि संध्याकाळी काय खाते याबद्दल सांगितलं आहे. दीप्तीने यावेळी तिला फळ खूप आवडतात आणि ते नैसर्गिक असल्याने ती सकाळी फळांचा समावेश असलेले पदार्थ किंवा नुसती फळं खाणे पसंत करते असं सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “मला फळं खूप आवडतात. त्यातल्या त्यात ॲव्हाकॅडो खूप आवडतं. मी ॲव्हाकॅडो टोस्ट, किंवा कधी ब्रेड खावंसं वाटलं नाही तर ॲव्हाकॅडो खाकरा आणि स्मुदी असा नाश्ता करते.”

असा असतो दिवसभराचा आहार

दुपराच्या जेवणात कोणते पदार्थ असतात याबद्दल दीप्ती म्हणाली, “मला जेवणात भाकरी लागते. ती सेटवर मिळते आणि उसळ असते. भाजी, वरण, सॅलेड, ताक असा आहार असतो.” दिवसातील शेवटचं मील म्हणजे संध्याकाळी ती काय खाते याबद्दल दीप्ती म्हणाली, “मी घरुनच पौष्टिक गोष्टी घेऊन येते. मी राजगिरा त्यात भोपळ्याच्या बिया, तुळशीच्या बिया घालते. त्यात साखर न टाकता खजुर घालते आणि दुध मिक्स करुन तेच मी संध्याकाळी खाते आणि तोच माझा डिनर असतो”.

दीप्ती पुढे तिच्या शरीरयष्टीबद्दल म्हणाली, “माझी बॉडी खूप फ्लॅकसीबल आहे. मी खायला लागले की वजन वाढतं आणि नियंत्रण ठेवलं की ते कमीसुद्धा होतं. मी बऱ्यापैकी व्यायाम करते आता फक्त मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने जमत नाहीये पण, मी पुन्हा सुरू करेन.”

दीप्तीने दिला फिटनेस मंत्र

दीप्ती पुढे तिच्या चाहत्यांना फिटनेसचा मंत्र सांगत म्हणाली, “सगळ्यात सोपा मंत्र हाच आहे की घरचं खा आणि वेळेत खा. संध्याकाळी सातच्या आत खाललं आणि दिवसातून दोन वेळाच जेवण केलं तर ते खूप फायदेशीर ठरेल”.