Deepti Lele on Skincare Secrets: आजच्या धावपळीच्या रोजच्या जगण्यात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम या बाबी आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. या सगळ्यात त्वचेची काळजी घेणे, केसांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक कलाकार याबद्दल वेळोवेळी सांगत असतात. ते त्यांची त्वचा, केस यांची काळजी कशी घेतात याबद्दल ते सोशल मीडिया, मुलाखती या माध्यमातून खुलासा करतात.
दीप्ती लेलेने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अभिनेत्री तिच्या त्वचेची कशी काळजी घेते, याबद्दलची माहिती दिली. ती नेमकं काय म्हणाली, याबद्दल जाणून घेऊ…
“व्यायाम खूप महत्त्वाचा…”
स्कीन केअर टिप्स देताना दीप्ती लेले म्हणाली, “शक्य तितकी फळं खाल्ली की, त्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. फळं सकाळी खाल्ली पाहिजेत. मी नाश्त्याला शक्यतो फळं खाते. त्यानं खूप उपयोग होतो. कारण- जितकं आपलं पोट साफ असेल, तितका आपला चेहरा चांगला राहतो. मग, मुरमं वगैरे येत नाहीत. पण, जर पोट साफ नसेल, तर ते सगळं चेहऱ्यावर येतं. तसेच सात-आठ तास चांगली झोपही घेतली पाहिजे.”
पुढे तिने, “नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. मला कधी वेळ असतो, कधी नसतो; पण, उठल्यानंतर १० मिनिटं का होईना, मी व्यायाम करते. मग त्यासाठी नियोजन केलं आहे. समजा, पाच मिनिटं वेळ असेल, तर अमुक हा व्यायाम करायचा, १० मिनिटं – २० मिनिटं असतील, तर वेगळा व्यायाम करायचा. मधे वेळ असतो, तेव्हा चालायचं. भरपूर पाणी प्यायचं आणि शक्य तितकं घरचं जेवायचं.एवढं पुरेसं आहे”, असे म्हणत त्वचेची काळजी कशी घ्यायची याबद्दलची माहिती दिली.
दीप्ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध व्हिडीओ, डान्स व्हिडीओ या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीस येते. सध्या ‘पाठराखीण’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेतील सहकलाकारांबरोबर ती डान्स व्हि़डीओ शेअर करताना दिसते.
दरम्यान, ‘पाठराखीण’ या मालिकेत सतत ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.
