Delnaaz Irani-Rajev Paul Divorce: ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या डेलनाझ इराणीने तिच्या आयुष्यातील एका अतिशय वेदनादायी काळाबद्दल भाष्य केलं आहे. शोमध्ये एक्स पती राजीव पॉलची अचानक झालेली वाइल्डकार्ड एन्ट्री डेलनाझसाठी मोठा धक्का होती. ती म्हणते, “मला तेव्हाच शंका आली होती जेव्हा निर्मात्यांनी मला ऑफर दिली. त्यांना एका कलाकाराला नाही, तर एका ‘घटस्फोटित’ व्यक्तीला समोर आणायचं होतं.” राजीवसोबतचा घटस्फोट तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता, जिथे नात्यात एकमेकांना गृहीत धरल्यामुळे दुरावा निर्माण झाला होता. आजही ही आठवण काढताना तिचे डोळे पाणावतात. केवळ शांततेसाठी तिने घटस्फोटावेळी कोणतीही पोटगी न घेण्याचा निर्णय घेतला होता.
मॅशेबल इंडियाशी बोलताना डेलनाझ बिग बॉसबद्दल म्हणाली, “बिग बॉसमध्ये माझा चांगुलपणा लोकांना खोटेपणा वाटला. लोकांना वाटलं की मी आहे तशी न वागता वेगळीच वागतेय, पण बाहेरच्या जगातील माझ्या जवळच्या व्यक्तींना आणि सहकाऱ्यांना मी नक्की कशी आहे हे माहित होतं. मी खेळावर लक्ष केंद्रित केलं होतं, पण खेळापलीकडेही एक जग आहे. तिथे तुम्ही नक्की कसे आहात हे खऱ्या लोकांना दाखवणं गरजेचं असतं. दुर्दैवाने, चांगुलपणाला नेहमीच ताकद न मानता कमजोरी मानलं जातं.”
बिग बॉस शो स्क्रिप्टेड असतो का?
शोच्या स्क्रिप्टबद्दल बोलताना डेलनाझने सर्व अफवा फेटाळून लावल्या. ती म्हणाली, “अनेक लोक मला विचारतात की हा शो स्क्रिप्टेड असतो का? पण तसं अजिबात नाही. तो स्क्रिप्टेड असूच शकत नाही. दिवसेंदिवस हा खेळ अधिक कठीण होत चालला आहे. हा इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला भरपूर पैसे मिळतात, त्यामुळे तिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करणे गरजेचं आहे. नंतर तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही.”
राजीव पॉलच्या वाइल्डकार्ड एन्ट्रीवर डेलनाझची प्रतिक्रिया
राजीव पॉल वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये येईल याची डेलनाझला कल्पना नव्हती. ती म्हणाली, “माझा एक्स पती राजीव शोमध्ये येईल हे मला माहीत नव्हतं, पण मनात कुठेतरी मला शंका होती की मला ही ऑफर का दिली जातेय? माझं कोणत्याही निर्मात्याशी मोठं भांडण झालं नव्हतं किंवा माझ्या करिअरमध्ये काही कॉन्ट्रोव्हर्सी नव्हती. मग माझ्या लक्षात आले की, ते एका कलाकाराला नाही तर एका घटस्फोटित व्यक्तीला ऑफर देत आहेत. त्याला तिथे पाहून मला धक्का बसला. त्याला पाहिल्यावर मी ठरवलं की त्याच्याबरोबर इतर स्पर्धकांसारखंच वागायचं.”
घटस्फोटाबद्दल डेलनाझ म्हणाली…
राजीवबरोबरच्या घटस्फोटाबद्दल डेलनाझ म्हणाली, “हे खूप दुर्दैवी आहे. जेव्हा तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या नात्यातून बाहेर पडता, तेव्हा एकाच घरात दोन अनोळखी व्यक्ती राहत असल्यासारखं वाटतं. लोक वर्तमानपत्रात त्यांच्या घटस्फोटाची घोषणा करायचे. माझ्यासाठी तर जगाला सांगण्यापूर्वीच २०१० च्या आधीच आमचं नातं संपलं होतं.”
जोडीदाराने गृहीत धरल्याने डेलनाझचा घटस्फोट
डेलनाझ पुढे म्हणाली, “नात्यात कधीकधी आपण एकमेकांना गृहीत धरतो आणि ही सर्वात वाईट गोष्ट आहे. माझ्या जोडीदाराने मला सतत गृहीत धरलं. कदाचित त्याला याची जाणीव नव्हती की पुढे हे सगळं इतकं गंभीर होईल. माझ्या डिक्शनरीमध्ये घटस्फोट हा शब्दही नव्हता. त्या काळातील भावनिक चढउतार आणि संघर्ष खूप मोठा होता.”
डेलनाझने कुटुंबापासून सगळं लपवलं
डेलनाझने हे सगळं कुटुंबियांना न सांगायचं ठरवलं होतं. “मी एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबातून येते. माझे आई-वडील आणि आजी-आजोबा अनेक वर्षे एकत्र राहिले होते. मी अनेक वर्षे माझ्या आई-वडिलांना काहीच सांगितलं नाही. माझ्या मित्रांना याबद्दल थोडी कल्पना होती. मला खात्री आहे की माझ्या आई-वडिलांनी मला नक्कीच पाठिंबा दिला असता, पण मला कोणावरही ओझं व्हायचं नव्हतं,” असं डेलनाझ म्हणाली.
डेलनाझ इराणीने पोटगी घेण्यास दिला नकार
घटस्फोटावेळी कोणतीही पोटगी घेतली नाही, असं तिने स्पष्ट केलं. “मला काहीही मिळालं नाही. हा घटस्फोट खूप गुंतागुंतीचा होता, कारण एकाला घटस्फोट हवा होता आणि दुसऱ्याला नको होता. याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा झाल्या आणि वाद झाले. पण मी इतर गोष्टींपेक्षा शांततेला जास्त महत्त्व दिलं. बोलणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात जुन्या गोष्टी विसरून पुढे जाणं कठीण असतं,” असं डेलनाझ म्हणाली.
पर्सीसोबतचं नातं आणि लग्नाबद्दलचं मत
२०१३ मध्ये डेलनाझ पुन्हा प्रेमात पडली. ती डीजे पर्सीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. अद्याप लग्न का केलं नाही, यावर ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर इतकी वर्षे घालवता आणि अचानक हे सर्व घडतं, तेव्हा पुन्हा कोणावर तरी प्रेम करणं किंवा नात्यात अडकणं खूप कठीण असतं. सुरुवातीला मी या नात्याला कोणतंही नाव दिलं नव्हतं. त्याला बॉयफ्रेंड म्हणणं त्याचा अपमान केल्यासारखं वाटतं, कारण त्याने माझ्या आयुष्यात येऊन मला त्या सर्व गोष्टी परत मिळवून दिल्या ज्या मी गमावल्या होत्या. पण आयुष्यात अंधश्रद्धा किंवा नशिबावरचा विश्वासही मोठी गोष्ट असते.”
लग्नाची वाटते भीती
डेलनाझ पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की जर मी पुन्हा लग्न केलं, तर कदाचित गोष्टी आधीसारख्या राहणार नाहीत. मला आता लग्नाची भीती वाटते. आम्ही ‘पॉवर कपल’ नावाच्या शोमध्ये गेलो होतो. तिथे आमचा होस्ट अरबाज खान मला सतत विचारायचा की, पर्सी खूप चांगला आहे, मग तू लग्न का करत नाहीस? पण माझ्या मनात एक भीती आहे, मी या माणसाला गमावू शकत नाही. तो सुद्धा घटस्फोटित आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास दोन दुखावलेली मने एकत्र आली आहेत आणि आता सुखाने आयुष्य जगत आहेत.”
दरम्यान, डेलनाझ इराणी आणि राजीव पॉल यांची भेट १९९३ मध्ये ‘परिवर्तन’च्या सेटवर झाली होती आणि १९९८ मध्ये त्यांनी लग्न केलं. पुढे २०१२ मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. आता डेलनाझ पर्सीबरोबर राहतेय, तो तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.
