Devmanus actress Simran Khedkar’s mother buys a new house: अभिनेत्री सिमरन खेडकर नुकतीच ‘देवमाणूस-मधला अध्याय’ या लोकप्रिय मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने आर्या ही भूमिका साकारली होती.

नवरा गेल्यानंतर स्वत:च्या स्वप्नांसाठी लढणारी, मोठ्या भावावर प्रचंड प्रेम करणारी पण गोपाळच्या जाळ्यात अडकलेली आर्या प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेनंतर अभिनेत्री ‘रुबाब’ या सिनेमातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. तिच्या आईने स्वत:चे घर घेतले आहे. त्याची झलक तिने काही फोटो शेअर करत दाखवली आहे. मात्र, घर घेण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यामागे तिच्या आईचे कष्ट होते. नवीन घराचे फोटो शेअर करताना सिमरनने आईच्या संघर्षाबद्दलही लिहिले आहे.

“माझी आई हे माझं पहिलं आणि मोठं प्रेरणास्थान…”

सिमरनने लिहिले, “माझी आई बारावी नापास आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी तिने स्वतःच्या हिमतीवर हक्काच्या घराची खरेदी केली. आईने लग्नानंतर १६ वर्षे घर सांभाळलं आणि गेल्या दहा वर्षांपूर्वी घर सावरण्यासाठी तिने बिझनेस करायला सुरुवात केली.”

“आज ती तिच्यासारख्या अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देते. तसेच स्वतः पैसे कमावण्याने स्त्रियांच्या आयुष्यात किती बदल होतात, ते बदल स्वतःसाठी आणि समाजासाठी किती गरजेचे आहेत हे ती गरजू महिलांना पटवून देऊन त्यांना पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून देते.”

पुढे तिने लिहिले, “मी आज प्रचंड अभिमानाने सांगते आहे की माझी आई हे माझं पहिलं आणि मोठं प्रेरणास्थान आहे. हे लिहितानासुद्धा डोळ्यात पाणी आहे. गेली ८ वर्षे माझी आई सिंगल पॅरेंट आहे.”

माझा मोठा भाऊ हा आज चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी अभिनय क्षेत्रात काम करते आहे, ते फक्त आईचा पाठिंबा आणि विश्वासामुळेच आहे. आईने दिलेले संस्कार, शिकवण किती महत्त्वाची आहे, हे आज घरापासून दूर वेगळ्या शहरात राहताना कायम जाणवते. जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे तिने दाखवून दिलं आहे. मला तिचा प्रचंड अभिमान, कौतुक आहे”, असे लिहित अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या.

सिमरनने शेअर केलेले हे फोटो घराच्या वास्तुशांतीचे आहेत. काही फोटोंमध्ये पूजा होताना दिसत आहेत, तर काहींमध्ये आई आणि भावाची झलकदेखील दिसत आहे.

अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अभिनेत्री आता आगामी काळात कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.