‘देवमाणूस’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक. ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. डॉ. अजित कुमार देव, डिंपल, सरूआजी आणि गावातील भोळ्या बायका यांनी या मालिकेत वेगळीच रंगत आणली होती. पहिल्या भागाच्या यशानंतर ‘देवमाणूस’चा दुसरा भाग प्रदर्शित झाला. त्यामध्ये किरण गायकवाडने देवीसिंह ही भूमिका साकारली. या भागातही त्याचा स्वभाव, ध्येय तेच होतं. या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता ‘देवमाणूस’चा तिसरा भाग म्हणजेच या मालिकेचा मधला अध्याय सुरू होणार आहे.
किरण गायकवाडने त्यानिमित्त नुकतीच ‘राजश्री मराठी शोबझ’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने या पर्वातील त्याची भूमिका, लूक याबद्दल आणि एकूणच या मालिकेच्या पूर्वीच्या दोन भागांबद्दलही सांगितलं आहे. ‘राजश्री मराठी शोबझ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण म्हणाला, “क्लीन शेवमध्ये मी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच काम करीत आहे. क्लीन शेव, कपाळी टिळा, असा हा माझा या पर्वात लूक असणार आहे.” त्यामध्ये किरणने त्याचा एक अनुभवसुद्धा सांगितला आहे. तो म्हणाला, “एकदा एक आजी-आजोबा होते. ते गमतीने मला म्हणाले की, त्याच्याकडे बघितलं का तो देवमाणूस. बायकांकडे वाईट नजरेने बघतो वगैरे. त्यावर ते आजोबा म्हणाले, त्याचं कसं आहे कपाळावर टिळा आणि बाईवर डोळा. हे ऐकून मला फार गंमत वाटली.”
‘राजश्री मराठी शोबझला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये किरणने या भूमिकेसाठी कशी तयारी केली याबद्दल सांगताना म्हणाला, “या मालिकेत मी टेलर आहे. मला टेलरसारखी मशीन चालवता येत नाही; पण प्रोमोच्या चित्रीकरणाच्या दिवशी मी मशीनसुद्धा चालवली आहे. आमच्या येथे जी अनुभवी माणसं आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. मी ब्लाऊज वगैरे शिवू शकत नाही; पण मी माझ्यासाठी एक हाफ पँट शिवली आहे. त्यामुळे आता पुढे जर माझ्याकडे कुठल्या प्रोजेक्टनिमित्त कॉस्ट्युमचं काम आलं, तर मी ते करू शकतो.”
दरम्यान, ‘देवमाणूस’ मालिकेच्या नवीन पर्वात कलाकारांची मोठी फौज असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘देवमाणूस’ – मधला अध्याय या पर्वामध्ये अभिनेता किरण गायकवाड गोपाळाराव ही भूमिका साकारत आहे. तर त्याचं हिम्मतराव लेडीज टेलर नावाने स्वत:चं दुकानही आहे. याव्यतिरिक्त पूर्वीच्या भागांमध्ये सरू आजीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री रुक्मिणी सुतार आता नवीन पर्वात सरू आजीची जुळी बहीण नरूआजीची भूमिका साकारणार आहेत. या मालिकेमध्ये अभिनेते माधव अभयनकरही झळकणार आहेत. त्यामुळे आता या मालिकेत गोपाळरावचं रहस्य कसं उलगडणार हे पाहणं रंजक ठरेल. आज २ जूनपासून ही मालिका ‘झी मराठी’वर रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे.