Devmanus Fame Kiran Gaikwad Wife : कोकण म्हणजे स्वर्ग, कोकण म्हणजे प्रेम…सणासुदीला, गावच्या पुजेला किंवा सुट्ट्या असल्यावर फक्त मन:शांती म्हणून मुंबईकर कोकणवासी गावची वाट धरतात. मराठी मनोरंजन विश्वात असे बरेच कलाकार आहेत, जे मुळचे कोकणातले आहेत. काही कलाकारांना जन्म, शिक्षण सगळं काही कोकणात गावी पूर्ण झालंय. आता फक्त कामानिमित्त ही मंडळी मुंबईत असतात. अशीच कोकणातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच वैष्णवी कल्याणकर. ‘देवमाणूस २’, ‘काजळमाया’ या मालिकांमधून वैष्णवी घराघरांत पोहोचली.
वैष्णवी मूळची कोकणातली. म्हणूनच किरण-वैष्णवीचं लग्न सुद्धा सावंतवाडीत पार पडलं होतं. किरण सध्या ‘देवमाणूस’ मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर, वैष्णवी सध्या तिच्या माहेरी रमल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री तिच्या गावच्या घराचे, आमराईचे, कोकणी पदार्थांच्या रेसिपीजचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतेय.
वैष्णवीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती गरमागरम काजू भाजत असल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये म्हणते, “मी आता चूल तयार करतेय आणि आमच्या कोकणात काजू कसे भाजले जातात…हे तुम्हाला दाखवते. हा काजू भाजण्यासाठी खास पत्रा असतो. तुम्ही पाहू शकता या पत्र्यावर आडव्या खाचा पाडण्यात ( कोयत्याने पत्र्याला होल पाडणे ) आल्या आहेत. हा पत्रा चुलीवर ठेवून यात आता काजूगर भाजायचे.”
पुढे, वैष्णवीने हे काजूगर पत्र्यावर ठेवले आणि सगळे काजू एका काठीच्या साहाय्याने भाजले. काजू भाजण्याची कोकणी पारंपरिक पद्धत कशी असते याची माहिती तिने आपल्या चाहत्यांना दिली आहे. काजू भाजल्यावर वैष्णवीने हाताला तेल लावलं आणि हे भाजलेले काजू फोडून ते एका केळीच्या पानावर सर्व्ह केले.
वैष्णवीचं हे कोकणी संस्कृतीचं ज्ञान, तिची आवड पाहून चाहते भारावून गेले आहेत. तिचा नवरा किरण गायकवाडने या व्हिडीओवर हार्ट इमोजी देत खास कमेंट केली आहे. तर, अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा वैष्णवीने शेअर केलेल्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, वैष्णवी आता लवकरच ‘घबाडकुंड’ या मराठी सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
