Devmanus Fame Sudhakar shares emotional post for onscreen mother: मालिका, चित्रपटांत दिसणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांशी कसे वागत असतील, पडद्यामागे त्यांचे कसे नाते असेल असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.

सोशल मीडियामुळे अनेकदा पडद्यामागील गमतीजमती, अनेकदा भावूक करणारे क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळतात. पडद्यामागे त्यांच्यात कसे बॉण्डिंग आहे, हेदेखील पाहायला मिळते.

देवमाणूस मधला अध्याय या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. मालिकेतील गोपाळ, लाली, आप्पा, सुधाकर, सुधाकरची आई, हृतिक, इन्स्पेक्टर जामकर ही आणि इतर पात्रे लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. ‘देवमाणूस’मधील प्रत्येक पात्राची खासियत आहे. वागण्याची, बोलण्याची स्टाईल, डायलॉग्ज हे लोकप्रिय ठरताना दिसत आहेत.

आता मालिकेत गोपाळचा मोठा भाऊ सुधाकर ही भूमिका अभिनेता रोहित भोसलेने साकारले आहे. तर त्याच्या आईची रंजना ही भूमिका अपर्णा क्षेमकल्याणी यांनी साकारली आहे.

“पुढे आयुष्यात कधी गोंधळलो, कधी आतून….”

अपर्णा क्षेमकल्याणी यांनी ऑनस्क्रीन लेकासाठी स्वत: मफलर विणला आहे. त्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले, “सुधी, मी तुझ्यासाठी मफलर विणतीये, असं तू मला म्हणालीस आणि तू चक्क सेटवरती मफलर विणायला सुरुवात केलीस. तू मिळेल त्या वेळेतून फक्त मफलर विणत होतीस.”

पुढे त्याने लिहिले, “आयुष्यात पहिल्यांदा मी माझं बर्थडे गिफ्ट बनताना नाही, तर विणताना पाहिलं. ते खरंच खूप भारी फिलिंग होतं. बघ ना, तुला तो मफलर विणायला जेवढा वेळ लागला नाही, त्यापेक्षा जास्त वेळ मी फक्त पोस्ट करण्यासाठी घेतला.”

“एकदा एखादी गोष्ट मिळाली की, तिची किंमत राहत नाही, असं म्हणतात; पण इथे तसं नाही. मी तुला यात क्षणोक्षणी मायेची, आपुलकीची आणि प्रेमाची ऊब ओतताना पाहिलंय. मग याची ऊब मला फक्त थंडीपासूनच वाचवेल का? पुढे आयुष्यात कधी गोंधळलो, कधी आतून थंड पडलो, तर हा मफलर मला कायम ऊर्जित करेल.”

“दोन श्वासांच्या अंतरातसुद्धा तू…”

रोहितने पुढे लिहिले, “दोन श्वासांच्या अंतरातसुद्धा तू तुझं वेगळं विश्व निर्माण करत असतेस. मी ते तुला करताना पाहिलंय. त्या विश्वात हरवताना, रमताना पाहिलं आहे. हे फक्त तुलाच जमू शकतं. हे असं गिफ्ट मला आयुष्यात पाहिल्यांदाच मिळालंय. तुझ्याकडून मिळालेलं हे गिफ्ट फक्त मनापासून स्वीकारतच नाही, तर अंगीकारतसुद्धा आहे. असा हा प्रेमाचा अटॅक तुला सतत येऊ देत.”

पुढे त्याने “तुझाच सुधी – सुध्या – सुधाकर- रोहित खूप खूप धन्यवाद. खूप खूप प्रेम”, असे लिहीत शेवट केला आहे. तसेच, त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. रोहितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सेटवर मफरल विणत असल्याचे दिसत आहे.

नेटकरी म्हणाले…

या पोस्टवर नेटकऱ्यांनीदेखील कमेंट्स करत कौतुक केलं आहे. “शेवटी आपल्या मुलालाच दिलं”, “आईनं आपल्या पोरालाच दिली. शेवटी आई ती आईच असते”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

दरम्यान, देवमाणूस मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.