Devmanus Fame Kiran Gaikwad Wife Vaishnavi Kalyankar : मराठी मालिकाविश्वातून घराघरांत पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका ‘देवमाणूस’ म्हणून किरण गायकवाडला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘देवमाणूस’, ‘लागिरं झालं जी’ या मालिकांमुळे किरण महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. त्याने वैयक्तिक आयुष्यात १४ डिसेंबर २०२४ रोजी वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधली. किरण आणि वैष्णवी या दोघांनी एकत्र ‘देवमाणूस २’ मध्ये काम केलं होतं. आता किरण गायकवाड ‘कोकणचा जावई’ म्हणून देखील ओळखला जातो.
वैष्णवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. कोकणात माहेर असल्याने ती बऱ्याचवेळा आपल्या कोकणातील सुंदर घराची, पारंपरिक पदार्थांची झलक आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना दाखवत असते. काही दिवसांपूर्वीच वैष्णवीने ओल्या काजूगराची भाजी बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. आता वैष्णवीने शेअर केलेला आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
काजू, आंबा, नारळ, करवंद म्हणजे कोकणची शान! मुंबईकर कोकणवासी जेव्हा-जेव्हा गावी जातात…तेव्हा या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतात. वैष्णवी देखील गावी पोहोचल्यावर शिडीच्या आधारे माडाच्या ( नारळाच्या ) झाडावर चढली. यानंतर तिने कोयत्याने माडावरून ताजे नारळ काढले. व्यवस्थित खाली उतरून नंतर तिने हे नारळ कोकणातील पारंपरिक पद्धतीने कोयत्याने सोलले. झाडावरचा ताजा नारळ कसा असतो याची झलकही वैष्णवीने चाहत्यांना दाखवली. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. “स्वॅग जिचा भारी बायको पाहिजे नखरेवाली” हे गाणं तिने या व्हिडीओला जोडलं आहे.
वैष्णवीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “माडावरून ताजे नारळ काढण्यात वेगळी मजा आहे”, “ताई मानलं तुम्हाला”, “आमच्या गायकवाड बाई… डेअरिंगला मानलं तुमच्या”, “मस्तच ताई”, “अरे वाह…”, “वैष्णवी ताई व्हिडीओ सुंदर…फक्त काळजी घेत जा!”, “झाडावर चढताना व उतरताना काळजीपूर्वक लक्ष द्या”, “शहाळी काढली वाह हे सुद्धा तुम्हाला जमतंय” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, वैष्णवीने काही महिन्यांपूर्वीच ‘काजळमाया’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्याचं पाहायला मिळालं. पण, ही मालिका लवकर संपली. आता वैष्णवी छोट्या पडद्यावर केव्हा कमबॅक करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.
