Devmanus Upcoming Twist: रहस्यमयी, थरारक गोष्टी पडद्यावर किंवा टीव्हीवर पाहताना प्रेक्षकांना आपसूकच भीती वाटते. असे असले तरी पुढच्या क्षणाला काय घडणार याची उत्सुकतादेखील त्यांच्या मनात असते. त्यामुळे अशा मालिका, चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभत असतो. अशीच एक मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे आणि ती म्हणजे ‘देवमाणूस’.
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या देवमाणूस या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. ‘देवमाणूस : मधला अध्याय’मध्ये लोकांचे खून करून त्यांचे पैसे लुटणारा, लालची स्वभावाचा देवीसिंग सध्या गोपाळ या नावाने राहत आहे. एकीकडे खून करत असलेला, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा, पैशांसाठी काहीही करायला तयार असणारा गोपाळ मात्र दुसरा चेहरा घेऊन वावरतो. लोक त्याला देवमाणूस, असे समजतात.
गोपाळच नाही, तर गोपाळची पत्नी लालीदेखील त्याच्यासारखीच असल्याचे पाहायला मिळते. गोपाळच्या प्रेमात जी मुलगी पडेल, तिला ती मारून टाकते. याआधी तिने माधुरी आणि आर्याचा खून केला होता. मात्र, ते तिने कोणाला कळू दिले नव्हते. आता मात्र, तिचा खरा चेहरा गोपाळसमोर येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“तो बायकांना असा प्रसाद…”
झी मराठी वाहिनीने देवमाणूस या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, गोपाळ शालिनीला रंग लावत आहे. शालिनीदेखील गोपाळच्या प्रेमात पडली आहे. मात्र, अचानक गोपाळ दिसेनासा होतो. शालिनी इकडे-तिकडे बघत असते. तितक्यात तिथे लाली येते. तिच्या कानात म्हणते, “झाले का रंग उधळून?”
गोपाळने तिला दिलेली सोन्याची चेन तिला शालिनीच्या गळ्यात दिसते. त्यानंतर तिचा राग अनावर होतो. ती शालिनीला धारदार शस्त्राने मारणार तितक्यात गोपाळ तिथे येतो आणि तिला अडवतो. मग शालिनी तिथून पळून जाते.
गोपाळ लालीला म्हणतो, “आता तुझा खरा रंग समोर आला. माधुरी, आर्याला तू मारलंस,” असे म्हणत तो तिला रंग लावतो. त्यानंतर तेच शस्त्र लाली गोपाळच्या गळ्याला लावते आणि म्हणते, “गेली २० वर्षं तुझी वाट पाहिली, तो बायकांना असा प्रसाद वाटायला नाही.” त्यानंतर ती स्वत:च्या कपाळाला बोट लावत म्हणते, “इथं ठेवून मिरवायला.” तिचा तो रुद्रावतार पाहून गोपाळच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘देवमाणसासमोर खरे रंग येणार, लालीची रक्तपंचमी सुरू होणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “लाली, आता सोडणार नाही”, “आय लव्ह लाली, खतरनाक”, “लाली भारी”, “जबरदस्त लाली”, “लाली खूप डेंजर आहे बाबा”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.


दरम्यान, लालीचे सत्य गोपाळसमोर आल्यानंतर मालिकेत नेमका काय ट्वि्स्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
