Devmanus Serial Updates : ‘देवमाणूस’ या थ्रिलर मालिकेत नेहमीच वेगवेगळे ट्विस्ट येत असतात. गेल्या काही दिवसांपासून गोपाळ सर्वांना लुबाडणारा बाबा होऊन एका वेगळ्याच लूकमध्ये सर्वांसमोर आला आहे. तर, दुसरीकडे जामकर देवीसिंगचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय. आता हळुहळू मालिकेत एक-एक सत्य उलगडत जाईल. या मालिकेचा हा तिसरा सीझन आहे….यापूर्वी ‘देवमाणूस’चे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामध्ये अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिका साकारत आहे.

‘देवमाणूस’ मालिकेच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर पाहायला मिळाली होती. तिने या मालिकेत सोनू ही भूमिका साकारली होती. ‘देवमाणूस २’च्या सेटवरच किरण-वैष्णवीची पहिली भेट अन् मैत्री झाली होती. मालिका संपल्यावर काही महिन्यांनी प्रेमाची जाहीर कबुली देत किरण-वैष्णवी लग्नबंधनात अडकले.

किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांचा विवाहसोहळा सावंतवाडीत पार पडला होता. हे दोघंही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. किरण-वैष्णवीचे फोटो, व्हिडीओ, रील्स नेहमीच सर्वत्र व्हायरल होत असतात. अशातच वैष्णवीने शेअर केलेल्या एका नव्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

वैष्णवीने ‘देवमाणूस’च्या सेटवरचा एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये किरण मालिकेतील सध्याच्या बाबा लूकमध्ये पाहायला मिळतोय. ‘देवमाणूस’च्या सेटवर वैष्णवीला पाहून ती या भागात पुन्हा एन्ट्री घेतेय का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. याशिवाय वैष्णवीने या पोस्टला, “सोनू पुन्हा पडेल का देवमाणूसच्या प्रेमात ???” असं हटके कॅप्शन दिलं आहे. यामुळेच वैष्णवी-किरण देवमाणूसमध्ये पुन्हा एकत्र झळकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

वैष्णवीने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “वैष्णवी मॅडम कमबॅक होऊन जाऊद्यात”, “Nice Couple”, “मॅडम तुम्ही येताय का देवमाणूसमध्ये” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. मात्र, वाहिनीकडून यावर अधिकृतरित्या काहीच सांगितलं गेलेलं नाहीये.

दरम्यान, ‘देवमाणूस’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री १० वाजता प्रसारित केली जाते. रात्री उशिरा प्रसारित होऊनही या थ्रिलर मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय.