Devmanus Upcoming Twist: पैशांच्या मोहापायी अनेकांचा जीव घेणारा, स्वत:चे रूप बदलून गुन्हे लपवणारा, लोकांच्या मनात आपण देवमाणूस आहोत असे ठासवणारा गोपाळ ऊर्फ देवीसिंग सतत काही ना काही कारस्थान करत असतो. देवमाणूस मालिकेतील गोपाळ सध्या गोपाळ बाबा झाला आहे. ईश्वराचा सेवक असे तो स्वत:ला म्हणवतो. आता त्याने स्वत:चा आश्रम सुरू केला आहे. त्याचा मोठा भक्तवर्ग निर्माण झाला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पैसा, सोने-चांदी मिळत असल्याचे दिसत आहे.

गोपाळ अनेकांचे खून करतो, अनेकांना मारतो, त्यांचे मृतदेह लपवतो. काही दिवसांपूर्वी गोपाळमुळे संग्रामच्या हातून त्याच्या वडिलांचा जीव गेला होता. संग्रामचा गोपाळवर राग आहे. तो भोंदू बाबा आहे, असा त्याचा विश्वास आहे. त्याने लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्याचे ऐकले नाही.

आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये संग्राम व गोपाळ समोरासमोर येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीने देवमाणूस या मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, संग्राम त्याची बहीण विभावरीला सांगतो की गोपाळला फोन करून बोलव. त्यानंतर विभावरी गोपाळला फोन करून बोलवते. त्याच्यासमोर संग्राम येतो. त्यांच्यात मारामारी होते.

गोपाळ नेमकं काय करणार?

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, संग्रामचा मृतदेह झाडावर लटकलेला दिसतो. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “बाबाला नडणार तो थेट फासावर लटकणार”, अशी कॅप्शन दिली आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नेटकरी म्हणाले…

एकाने लिहिले, “प्रेक्षकांना तुम्ही मूर्ख बनवताय. झी मराठी, देव माणूस मालिकावाल्यांना प्रेक्षक मूर्ख दिसतायेत का? तो किती मर्डर करतोय, पकडला जात नाहीये. बिनधास्त मारतोय, गाढतोय. काय करता तुम्ही? सीरियल बंद करा, नाहीतर व्यवस्थित काहीतरी प्रेरणादायी दाखवा”, दुसऱ्या एकाने लिहिले, “इतके खून करतो, इतक्या माणसांना मारून टाकलं तरी पोलिसांना त्याचा पुरावा का सापडत नाही ? जामकर सर नीट चौकशी करा, त्याच्यावरती लक्ष ठेवा”, एकाने लिहिले, “या मालिकेत चौकशी करायला सीआयडीला बोलवा. जामकरना काही पुरावा सापडत नाहीये.” आणखी एकाने लिहिले, “रोज बघणारे मूर्ख आहेत”, अशा अनेक कमेंट्स आहेत.

दरम्यान, आता इन्स्पेक्टर जामकरला गोपाळ विरुद्ध काही पुरावे सापडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.