Devmanus Upcoming Twist: ‘देवमाणूस’ या मालिकेत सतत कोणते ना कोणते ट्विस्ट पाहायला मिळतात. देवीसिंग ऊर्फ गोपाळ त्याच्या लालसेपोटी अनेकांचे खून करत आहे. खुनांची अशी मालिका सुरू झाली असून, गोपाळ मात्र त्यातून स्वत:ची सुटका करून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या ‘देवमाणूस: मधला अध्याय’ या मालिकेत दररोज काहीतरी वेगळे घडते. मालिकेतील गोपाळ हा खरा गोपाळ नसून देवीसिंग आहे. देवीसिंगने खऱ्या गोपाळला मारले आहे. त्याला मारल्यानंतर त्याने स्वत:चे नाव गोपाळ असल्याचे सांगत सर्वांची मने जिंकली. गोपाळच्या घरात तो राहू लागला.

याबरोबरच, कुटुंबासह गावातील प्रत्येकाच्या मनात त्याने स्वत:ची जागा निर्माण केली. मात्र, त्याचा जगासमोर दाखवण्याचा चेहरा वेगळा आणि प्रत्यक्षात तो वेगळा असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या लालची स्वभावामुळे त्याने अनेकांचा जीव घेतला आहे. आता या सगळ्यात लालीदेखील त्याला साथ देत असल्याचे पाहायला मिळत आहे. लालीचे गोपाळवर प्रेम आहे. जेव्हा तिला समजले की, गोपाळ आणि माधुरी हे पळून जाणार आहेत, तेव्हा तिने माधुरीचा खून केला.

जेव्हा आर्या आणि गोपाळमधील जवळीक वाढली तेव्हाही तिने आर्याचा खून केला. तिला वाटते की, गोपाळच्या प्रेमात पडणाऱ्या स्त्रियांची चूक आहे. म्हणून गोपाळ तिच्यावर प्रेम करत नाही. इतकेच नाही, तर गोपाळवर कोणतेही संकट येऊ नये, तो पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणूनही ती त्याला मदत करताना दिसते. गोपाळप्रमाणेच लालीदेखील आता खून करत असल्याचे दिसत आहे. आता मात्र, लाली आणि गोपाळ समोरासमोर येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

“माझा जोकर करून…”

झी मराठी वाहिनीने देवमाणूस मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लालीला एका खुर्चीवर रशीच्या साह्याने बांधून ठेवले आहे. गोपाळ रंगीबेरंगी केस लावून, तसेच जोकरसारखा मेकअप करून आल्याचे पाहायला मिळते. तो म्हणतो की, लालीजींच्या सेवेत गोपाळ हजर आहे.

पुन्हा तो लालीजवळ जात म्हणतो, “माझा जोकर करून ठेवलाय ना? आता बघा मी माझे खेळ कसे खेळतो.” पुढे पाहायला मिळते की, तो लालीला जबरदस्तीने हसायला सांगतो आणि स्वत: मोठमोठ्याने हसतो. त्यानंतर लालीही विचित्र हसते. ते गोपाळसाठी अनपेक्षित असल्याने त्याच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव पाहायला मिळतात.

नेटकरी म्हणालेले…

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘या नवीन खेळाचा सूत्रधार कोण?’, अशी कॅप्शन दिली आहे. प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “आता खरी मजा येणार”, दुसऱ्या एकाने लिहिले, “अजून लालीचा भूतकाळ दाखवायचा आहे. मजा येईल”, एकाने लिहिले, “दररोज १० वाजता पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक घेऊन बसावे”, आणखी एकाने लिहिले, “लालीजी देवमाणूसवर भारी”, एकाने लिहिले, “चोरावर मोर”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपासून इन्स्पेक्टर जामकर खुन्याचा तपास घेत आहेत. त्यांना बऱ्याचदा गोपाळवर संशयही आला आहे. पण, पुराव्याअभावी त्यांच्या हाती काहीच लागत नाही. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.