Devmanus Upcoming Twist: ‘देवमाणूस मधला अध्याय’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी लालीने आर्याचा खून केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, तिचा भाऊ इन्स्पेक्टर जामकर किंवा गावातील इतर कोणालाही हे माहीत नाही. आर्याचा खून झाला आहे, ती जिवंत नाही हे फक्त गोपाळ आणि लालीला माहीत आहे.
‘देवमाणूस’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, इन्स्पेक्टर जामकरचा गोपाळवर आधीपासूनच संशय आहे. तो चांगला व्यक्ती नाही, लोकांना फसवतो याचा अंदाज जामकरला आहे. मात्र, कोणताही पुरावा सापडला नसल्याने त्याला आतापर्यंत कधीही अटक झाली नव्हती.
रुग्णालयातील एक कागद सापडला, तसेच तो आर्याबरोबर रुग्णालयात गेल्याचा जामकरला पुरावा मिळाला. त्यानंतर त्याला अटक झाली होती. पोलिस कोठडीत नेल्यावर सत्य वदवून घेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याने त्याचा गुन्हा कबूल केला नाही.
लाली गोपाळला तुरुंगातून सोडवण्यासाठी जामकरला भेटते. ती त्याला सांगते की आर्या प्रेग्नेंट होती, तिला तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जायचे होते, पण स्वत: आजारी असल्याने गोपाळला आर्याबरोबर पाठवले; तसेच मी शपथ दिल्याने गोपाळने याबद्दल काही सांगितले नाही. गोपाळचा यामध्ये काही दोष नाही, असे तिने जामकरला पटवून दिले. तसेच आर्या सध्या कुठे आहे, कोणाबरोबर गेली आहे, याची तिला व गोपाळला कल्पना नसल्याचेही ती जामकरला सांगते.
लालीच्या तालावर देवमाणूस नाचणार
आता ‘देवमाणूस’ मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लाली पैसे मोजत आहेत, तर गोपाळ भांडी घासत आहे.
लाली विचारते की भांडी? गोपाळ म्हणतो री घासतोय. लाली विचारते की कपडे? गोपाळ म्हणतो की धुतोय. लाली विचारते की ,शेण? गोपाळ उत्तर देत म्हणतो, काढतो. लाली पुन्हा विचारते, “झाडू?” गोपाळ म्हणतो, “मारतो.” लाली विचारते, “लादी?” गोपाळ म्हणतो, “पुसतोय.”
शेवटी लाली विचारते, “पाय?” त्यावर गोपाळ चेपतो असे म्हणत तिचे पाय दाबत असल्याचे दिसत आहे. गोपाळच्या चेहऱ्यावर चिडचिड तर लालीच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे भाव दिसत आहेत.
नेटकरी म्हणाले…
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लालीच्या तालावर देवमाणूस नाचणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “लाली बाईने या वाघाचा उंदीर केला.” दुसऱ्याने लिहिले, “वाह! लाली शेरास सव्वाशेर आहे”, आणखी एकाने लिहिले, “एक दिवस लालीचा खून होणार”, एकाने लिहिले, “सर्वोत्तम मालिका”, आणखी एकाने लिहिले, “अहो, हे काय, आम्ही पाहतो काय, चक्क देवमाणूस दाबतोय बायकोचे पाय, लालीपुढे गोपाळने शरणागती पत्करली काय, उठता लाथ बसता बुक्कीपेक्षाही ही कठीण शिक्षा नाही का?”, एकाने लिहिले, “तो देवमाणूस आहे हे विसरून चालणार नाही”, आणखी एकाने लिहिले, “लाली आता मरते”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

