Devmanus Upcoming Twist: गावाकडील पार्श्वभूमी असलेली देवमाणसाची गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पैशाच्या हव्यासापोटी एक माणूस कोणते टोक गाठू शकतो हे या मालिकेत पाहायला मिळते. विशेष म्हणजे ही व्यक्ती खून करते, निष्पाप, गरजू आणि सुंदर महिलांना स्वत:च्या जाळ्यात ओढते, त्यांच्याकडील पैसे-दागदागिने मिळवते आणि त्यांना मारून टाकते.
हीच व्यक्ती समाजासमोर मात्र चांगले असल्याचे दाखवते. सर्वांसमोर संकटात असलेल्या एखाद्याला वाचवते, मदत करते; त्यामुळे कोणीही तिच्यावर संशय घेत नाही. ही व्यक्ती म्हणजे देवमाणूस मालिकेतील गोपाळ आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोपाळ आणि प्रेक्षकांना एकच प्रश्न सतावत होता. तो म्हणजे, जर माधुरीचा खून गोपाळने नाही केला तर तो कोणी केला? हा खून हिम्मतरावने केल्याचे अनेकांना वाटले होते. मात्र, माधुरीचा जीव घेऊन तिच्याकडील सोन्याचे दागिने आणि पैसे लंपास करणारी ही व्यक्ती तिसरीच कोणीतरी आहे.
माधुरीचा खून गोपाळ किंवा हिम्मतरावने नाही तर…
झी मराठी वाहिनीने देवमाणूस-मधला अध्याय या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जिथे माधुरीचा मृतदेह पुरलेला असतो त्या जागेवर आप्पा खणतात. त्यांना माधुरीचा मृतदेह दिसतो. तितक्यात तिथे गोपाळ येतो. तो त्यांना म्हणतो, “पैशांसाठी माधुरीला मारलं ना?”, त्यावर आप्पा त्याला म्हणतात, “मी नाही, तुझं पाप माझ्या माथी मारू नकोस”, त्यावर गोपाळ म्हणतो, “बास आप्पा, यात मला अडकवू नका”, त्यावर आप्पा म्हणतात, तू नाही मारलं, मी मारलं नाही, मग तिला मारलं कुणी?”
दुसरीकडे कोणीतरी विळ्याने एका ठिकाणी जमीन खणत असल्याचे दिसते. ते हात एका स्त्रीचे आहेत. हातात बांगड्या दिसत आहेत. खणलेल्या जमिनीतून ती एक बॅग बाहेर काढते, त्यातील पैसे काढून पाहते. तिने स्वत:च्या अंगावर चादर ओढली असल्याने तिचा चेहरा दिसत नाही. पण ती म्हणते, “मी संपणाऱ्यातील नाहीये, पुरून उरणारी आहे.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “तिचं कृत्य बघून देवमाणसाचाही उडणार थरकाप! कोण असेल ती?”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
या प्रोमोवर अनेकांनी डिंपलचे नाव घेतले आहे. देवमाणूसच्या पहिल्या भागात डॉक्टर अजितकुमारला साथ देताना ती दिसली होती, तर काहींनी गोपाळच्या बायकोचे लालीचे नाव घेतले आहे.





गोपाळ हा खरा गोपाळ नसून तो अजितकुमारच आहे. त्याने अनेक वर्षांपासून घरापासून दूर असलेल्या गोपाळला मारून त्याची जागा घेतली आहे. आता माधुरीचा खून नेमका कोणी केला? तिच्यामुळे गोपाळचे सत्य सर्वांसमोर येणार का? या ट्विस्टमुळे डिंपलची मालिकेत एन्ट्री होणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
