‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर तिची मतं ठामपणे मांडत असते. आता तिने गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. हा मुद्दा वाद निर्माण करण्याइतका मोठा नाही. कोणत्याही धर्मातील व्यक्ती दुसऱ्या धर्माच्या भक्तीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकते, असं मत अमृता फडणवीस यांनी मांडलं. त्यानंतर देवोलीना भट्टाचार्जीची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने कुणाचंही नाव घेतलेलं नाही.
एक्सवर पोस्ट करत देवोलीनाने लिहिलं, “गरबा म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत तरी आहे का?
जेव्हा होळीला थोड्याशा रंगांवरूनही निष्पाप लोकांचे जीव जातात, जेव्हा ‘वंदे मातरम्’ म्हटल्याने कोणाचा तरी धर्म भ्रष्ट होतो असं मानलं जातं… मग दुर्गा मातेच्या भजनांवर केला जाणारा गरबा अचानक एवढ्या मोठ्या वादाचा विषय कसा बनतो?
एवढा संताप आणि विरोध का दाखवला जातोय?
गरबा म्हणजे फक्ट डान्स नाही. ‘भक्ती’ हा त्याचा खरा आत्मा आहे. दुर्गा मातेबद्दल असलेली श्रद्धा, भाव आणि भक्ती व्यक्त करण्याचे ते एक माध्यम आहे. आणि जर तुम्हाला भक्तीभावाशिवाय फक्त नाचायची एवढी हौस असेल, तर दांडिया घ्या आणि स्वतःच्या घरात खेळून आनंद साजरा करा. पण ज्यांच्यासाठी गरबा हा श्रद्धा आणि भक्तीचा भाग आहे, त्यांना तरी शांततेने सेलिब्रेट करू द्या. त्यांच्या श्रद्धेला उगाच वादाचं रूप देऊ नका.
बास! हा मूर्खपणा आता पुरे झाला!”

धर्म घरात पाळावा सार्वजनिक ठिकाणी नाही – अमृता फडणवीस
गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका भाजपा नेते नितेश राणे यांनी मांडली. त्यानंतर या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी चंद्रपुरात प्रतिक्रिया दिली. गरबा हा सर्वसमावेशक उत्सव असून, एखादी मुस्लीम व्यक्ती गरबा पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रमात येत असेल, तर त्यात गैर काहीही वाटत नाही. धर्म घरात पाळावा सार्वजनिक ठिकाणी पाळू नये, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला नितेश राणेंचा पाठिंबा
नवरात्रोत्सवा दरम्यान गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याच्या आणि ओळखपत्रांची पडताळणी तसंच कपाळावर टिळा लावण्याच्या विश्व हिंदू परिषद (VHP) च्या भूमिकेला महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि भाजपा नेते नितेश राणे यांनी जाहीर पाठिंबा दिला. “विश्व हिंदू परिषदेने केलेल्या मागण्या अजिबात चुकीच्या नाहीत. जे लोक मूर्तीची पूजा करत नाही, जर तुम्ही आमच्या धर्माचं पालन करत नसाल, तर तुम्हाला आमच्या नवरात्र किंवा गरबा उत्सवांमध्ये येण्याचा काय अधिकार आहे? कारण अनेक तपासांमधून आणि आमच्याकडे असलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झालं आहे की, अशा सणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडल्या आहेत. ईदला कोणत्याही काफिरला यायला परवानगी नसते. विश्व हिंदू परिषदेने केलेली मागणी योग्य आहे,” असं राणे म्हणाले.
