देवयानी म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या नव्या मालिकेत शिवानी झळकणार आहे. यामध्ये अभिनेता समीर परांजपे, मानसी कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. १७ जूनपासून शिवानीची ही नवी मालिका सुरू होतं आहे. पण त्यापूर्वी ‘देवयानी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे.

‘स्टार प्रवाह’च्या गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘देवयानी’ मालिका आहे. या मालिकेतील आता प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या मालिकेत विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहेत. ‘देवयानी’ मालिकेत नमितच्या भूमिकेत पाहायला मिळालेला अभिनेता माधव देवचकेची ६ वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा – ‘येड लागलं प्रेमाचं’ने लोकप्रिय मालिकांना मागे टाकत TRP मध्ये मारली बाजी, ‘अबीर गुलाल’ मालिका ‘या’ क्रमांकावर

अभिनेता सचित पाटील व गौरी कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अबोली’ मालिकेत माधवी देवचके झळकणार आहे. ‘अबोली’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचा अबोलीने घेतलेला वसा अनेकांसाठी आशेचा किरण ठरतोय. नवनव्या केसचा छडा लावत असतानाच आता अबोलीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचं नाव आहे श्रेयस सुमन मराठे. अभिनेता माधव देवचके श्रेयस सुमन मराठे हे पात्र साकारणार आहे. अबोलीच्या विरोधात श्रेयस केस लढणार आहे. या नव्या आव्हानाचा अबोली आणि अंकुश कसा सामना करणार? हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

हेही वाचा- “हास्यजत्रेशिवाय हे शक्य नव्हतं…”, प्रियदर्शनी इंदलकरचा सर्वात्कृष्ट विनोदी अभिनेत्री पुरस्कारने गौरव, पोस्ट करत म्हणाली…

दरम्यान, माधव देवचके जवळपास ६ वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत दिसणार आहे. याआधी ‘देवयानी’ आणि ‘गोठ’ या मालिकेत माधवने लक्षवेधी भूमिका साकारली होती. श्रेयस सुमन मराठे ही व्यक्तिरेखा देखील लक्षवेधी असेल. श्रेयसचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे नावासोबतच तो आईचही नाव लावतो. अतिशय हुशार, यशस्वी आणि हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणारा श्रेयस अबोली-अंकुशच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालथ घडवणार? हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे.