Chinmayee More shares experience of Zee Marathi Awards: ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेत ‘राधिका’ ही भूमिका साकारणारी चिन्मयी मोरेने झी मराठी अवॉर्ड्स २०२६ चा अनुभव सांगितला. चिन्मयीसाठी हा पहिलाच अवॉर्ड सोहळा, पहिलाच रेड कार्पेट आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पहिल्यांदाच डान्स करण्याची संधी मिळाली. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ..
“ही संधी मला मिळेल आणि मी हे सगळं करू शकेन, असा…”
चिन्मयीने मराठी सिरिअल्स ऑफिशिअलशी संवाद साधला. ती म्हणाली, “खरं तर, आपण प्रत्येकानेच कधी ना कधी चित्रपटांमध्ये पाहिलेलं असतं की एखादं सुंदर गाणं सुरू असतं, हिरोईन स्टेजवर नाचत असते आणि तिच्या मागे अनेक डान्सर्स तिच्याबरोबर ताल धरत असतात. ते पाहताना कधीतरी आपल्यालाही असं काहीतरी अनुभवायला मिळावं, असं मनापासून वाटतं. माझ्यासाठी तो क्षण प्रत्यक्षात जगणं म्हणजे जणू एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं.”
पुढे ती म्हणाली, “खरं सांगायचं तर, ही संधी मला मिळेल आणि मी हे सगळं करू शकेन, असा विचारसुद्धा कधी केला नव्हता. स्टेजवर गाणं सुरू आहे, समोर प्रेक्षक आहेत आणि माझ्या पाठीमागे डान्सर्सचा ग्रुप, तो संपूर्ण अनुभवच काहीतरी वेगळा होता. शब्दांत व्यक्त न करता येणारी भावना आहे. आयुष्यभर लक्षात राहणारा, अविस्मरणीय क्षण होता हे माझं पहिलंच अवॉर्ड फंक्शन आणि त्यातही एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पहिल्यांदाच डान्स असा डान्स केला.”

ती असेही म्हणाली, “शाळेत असताना छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेताना कधी वाटलंच नव्हतं की एक दिवस इतक्या मोठ्या व्यासपीठावर डान्स करण्याची संधी मिळेल. आयुष्य आपल्याला कधी, कुठे आणि कोणत्या रूपात आपली स्वप्नं जगण्याची संधी देईल, हे खरंच सांगता येत नाही. या सुंदर अनुभवासाठी आणि माझ्या आयुष्यात हा अविस्मरणीय क्षण जोडल्याबद्दल मनापासून धन्यवाद, झी मराठी आणि माझ्या ‘धाकट्या सूनबाई’च्या संपूर्ण टीमचेही खूप खूप आभार. तुमच्यामुळे हा अनुभव घेता आला आणि एक सुंदर स्वप्न जगता आलं.”


चिन्मयी पुढे म्हणाली, “माझ्या भूमिकेच्या स्वभावानुसार मी तयार झाले होते. तो क्षण अनुभवण्याची, तयार होऊन मीडियासमोर जाण्याची आणि आयुष्यात पहिल्यांदाच रेड कार्पेटवर चालण्याची मनात एक वेगळीच उत्सुकता होती.काही अनुभव आपल्याला फक्त आनंद देत नाहीत, तर आपण पाहिलेल्या स्वप्नांच्या आणखी जवळ घेऊन जातात आणि हा अनुभव माझ्यासाठी अगदी तसाच होता”, असे म्हणत चिन्मयीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
