झी मराठीवर आजपासून ‘धाकट्या सूनबाई’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये नवोदित अभिनेत्री चिन्मयी मोरे ‘राधिका’ची प्रमुख भूमिका साकारत आहे. सोज्वळ, प्रेमळ आणि आपल्या माणसांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणारी राधिका प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करेल, असा विश्वास चिन्मयी व्यक्त करते. नागपूरची चिन्मयी मोरे लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राशी जोडलेली आहे. आता ‘धाकट्या सुनबाई’मधून ती पहिल्यांदाच डेली सोपमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. या नव्या प्रवासाबद्दल आणि राधिका या व्यक्तिरेखेबद्दल चिन्मयीने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

चिन्मयी सांगते, “मी मूळची नागपूरची आहे. माझी आई नाट्य क्षेत्रात असल्यामुळे अगदी लहानपणापासूनच माझा या क्षेत्राशी संबंध आला. मी अवघ्या १० दिवसांची होते, तेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आले होते. त्यानंतर हळूहळू चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे व्यावसायिक नाटकं, राज्य नाट्य स्पर्धा, फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, जाहिराती अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र, डेली सोपचा अनुभव माझ्यासाठी पहिलाच आहे आणि त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. मला अभिनयाची आवड होती; पण गंमत म्हणजे मला कधीच आपण अभिनेत्री होऊयात असं वाटलं नाही. माझं स्वप्न तर पायलट होण्याचं होतं. काही कौटुंबिक कारणांमुळे ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही. आज मागे वळून पाहताना वाटतं की, कदाचित माझ्यासाठी हाच प्रवास लिहिलेला होता. अभिनयाने मला वेगवेगळ्या माध्यमांतून खूप काही शिकवलं आणि आता राधिकेच्या भूमिकेच्या निमित्ताने हा प्रवास एका नव्या टप्प्यावर आला आहे. त्यामुळे ही संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.”

chinmayee more
चिन्मयी मोरे

चिन्मयी पुढे म्हणाली, “या भूमिकेसाठी माझी निवड ऑडिशनच्या माध्यमातून झाली. आपण याआधी ज्यांच्याबरोबर काम केलेलं असतं, ते आपलं काम आणि आपल्यातला कलाकार कुठेतरी लक्षात ठेवून असतात. त्यातलेच एक म्हणजे अमित फाटक दादा. त्यांनी याआधी गजानन महाराजांची भूमिका साकारली आहे. आता त्यांच्या माध्यमातून मला राधिकेची भूमिका मिळणं, हा माझ्यासाठी खूप सुंदर योग आहे. त्यांच्या रूपाने मला महाराजांचा प्रसाद मिळाला, अशी माझी भावना आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळा आदर आणि आपुलकी आहे. दादांनीच प्रोडक्शनमध्ये माझं नाव सुचवलं होतं. त्यानंतर माझा फोटो पाहून मला ऑडिशनसाठी कॉल आला. मी ऑडिशन दिली आणि त्यानंतर माझी या भूमिकेसाठी निवड झाली.”

Dhaktya Sunbai
धाकट्या सूनबाई

दरम्यान, ‘धाकट्या सूनबाई’ मालिका २८ सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून दररोज सायंकाळी ६:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.