‘झी मराठी’ वाहिनीवर २८ सप्टेंबरपासून ‘धाकट्या सूनबाई’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. याची निर्मिती ‘कोठारे व्हिजन्स’कडून करण्यात आली आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री चिन्मयी मोरे आणि प्रसिद्ध अभिनेता मंदार जाधव यांची जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील ‘धाकट्या सूनबाई’मध्ये झळकणार आहे. तिचं नाव आहे ‘नसती उठाठेव’ या नावाने ओळखली जाणारी नेहा कुलकर्णी. तिच्या एन्ट्रीची लहानशी झलक नुकतीच प्रेक्षकांसमोर आली आहे.
नेहा ‘धाकट्या सूनबाई’च्या निमित्ताने पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर झळकणार आहे. यामध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. तिचं नाव आहे किमया! यासह आपण या मालिकेबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…
‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेत दोन कुटुंबांची गोष्ट, त्यांचे विचार आणि नात्यांमधील गुंतागुंत पाहायला मिळणार आहे. आपल्या माणसांची साथ आणि नात्यांमधला विश्वास आयुष्याला कसा अर्थ देतो, याची गोष्ट राधिका आणि वेदांतच्या आयुष्यातून ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत उलगडणार आहे.
कृष्ण मंदिराच्या पायऱ्यांवर लहानपणी सापडलेली राधिका ही आप्पा आणि निर्मलाची दत्तक मुलगी असते. आप्पांनी तिला कृष्णाचा प्रसाद मानून आपल्या मुलीप्रमाणे वाढवलं. सालस, मनमिळाऊ आणि उत्साही असलेली राधिका नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाते. मात्र, घरातील गोदाक्का तिला आजही ‘परकी’ मानतात. त्यामुळे प्रेम मिळत असूनही राधिकाच्या मनात आपल्या खऱ्या घराचा आणि आपल्या माणसांचा शोध कायम आहे. दुःखाच्या क्षणी ती कृष्णाशी मनमोकळेपणाने बोलते आणि त्यालाच आपला सखा मानते.
दुसरीकडे आहे पटवर्धन कुटुंबातील वेदांत . ‘आराधना’ या पूजा साहित्य, अत्तर आणि अगरबत्तीच्या व्यवसायाचा वारसदार. वेदांत हुशार, सुसंस्कृत आणि जबाबदार आहे. आई दमयंतीच्या शिस्तीत आणि विचारांमध्ये वाढलेला वेदांत कुटुंबाच्या परंपरांना महत्त्व देतो. मात्र, राधिकेला भेटल्यानंतर त्याच्या विचारांसमोर एक नवा प्रश्न उभा राहतो. माणसाची ओळख त्याच्या रक्ताने आणि कुळाने ठरते की त्याच्या मनाने? राधिकेमुळे वेदांतचा स्वतःच्या विचारांकडे पाहण्याचा प्रवास सुरू होतो.
या मालिकेत चिन्मयी मोरे राधिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पटवर्धन कुटुंबात मंदार जाधव वेदांतची भूमिका साकारत आहे. ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे.
