Dhananjay Powar on Jahnavi Killekar: जान्हवी किल्लेकर सध्या ‘सायको रंगा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिने केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. कोल्हापूरमध्ये शूटिंग होते, त्यावेळी बिसलेरीच्या पाण्याने अंघोळ केली, असे वक्तव्य तिने केले होते. त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले.
जान्हवी किल्लेकर काय म्हणालेली?
सायको रंगाचे शूटिंग कोल्हापूरला होतं, त्याचं टेन्शल आलेलं, असं जान्हवी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. पुढे कारण सांगत ती म्हणाली, “मला त्वचेच्या खूप समस्या आहेत. त्यामुळे मी बाहेर कुठे असले, तर मला तिथलं हवामान लगेच मानवत नाही. आता मुंबईच्या पाण्याची सवय झाली आहे. तर ते कसं मॅनेज करायचं, असा विचार आलेला. मी बिसलेरीच्या पाण्यानं अंघोळ करायचे. कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे; पण आपली त्वचा वाईट आहे, त्याचं काय करणार?”
जान्हवीच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. आता या सगळ्यात धनंजय पोवारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत यावर वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, “आपण कोल्हापूरकर म्हणजे प्रेमळ माणसं, प्रत्येकाच्या चुका पोटात घालणारी माणसं आहोत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची अतिशय सुंदर, मनमिळाऊ, प्रेमळ लोक आणि भाषेत गोडवा अशी ओळख आहे. मला असं वाटतं की, इथली कुठलीही व्यक्ती स्वत:च्या व्ह्युजसाठी, सोशल मीडियासाठी गोष्टी करते, असं अजिबात नाही. त्यांची ती भावना आहे, त्यांचं ते प्रेम आहे.”
धनंजय पोवार म्हणाला…
धनंजय पोवार म्हणाला, “आज मी स्पष्टपणे सांगतो की, लोकांनी मला कमेंट्समध्ये विचारलं की, तुम्ही कोल्हापूरच्या बाजूनं की जान्हवीच्या बाजूनं आहात? मी स्पष्ट सांगेन की, मी कोल्हापूरच्या बाजूनं आहे. माझी मैत्री माझ्यापुरती मर्यादित आहे. नात्यात मी तिला बहीण मानतो.”
पुढे तो म्हणाला, “ती मला दादा म्हणून हाक मारते. त्यावरही लोकांनी चुकीच्या कमेंट्स केल्या आहेत. मी त्याला उत्तर देणारच नव्हतो. पण, आजचा व्हिडीओ बघितला. तुम्ही तिच्या नवऱ्याला ट्रोल केलं, हे मला आवडलं नाही. कारण- ही भाषा आपली नाही. आपण एखाद्याच्या घरातील व्यक्तीवर, त्याच्या रंगावरून, त्याच्या वेशभूषेवरून बोलू शकत नाही. आपण असे कोल्हापूरकर अजिबात नाही. तिचा व्हिडीओ तुम्ही नीट पाहा. ती असं म्हणालीय की, तिला त्वचेचा प्रॉब्लेम आहे. कोल्हापूरचं पाणी खराब आहे, हे वाक्य तिच्याकडून आलेलं नाही. तिच्या त्वचेचा प्रॉब्लेम आहे. ती बाहेर कुठेही गेली, तरी ती बिसलेरीच्या पाण्यानं अंघोळ करते. आता ऐकताना आपल्याला कधी कधी अतिरेक वाटतो किंवा ते अतिशहाणपणाचं बोलणं झालं, असं वाटतं. पण, तो तिचा विचार आहे, त्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे, ते बोला. पण, मला एवढंच म्हणायचं आहे की, सोशल मीडियावर आपण जे कोल्हापूरकर आहोत, ते प्रेमळ आहोत.
“विनाकारण एका व्यक्तीला ट्रोल केलं जातंय”
तो असेही म्हणाला की, मागे एक महिला कोल्हापूरबद्दल बोलली होती. त्यावरचा रोष मी समजू शकतो, तो पटला, असं नाही. त्या बाईच्या घरावरसुद्धा वाईट वेळ आली असेल. तिला घरातून बाहेर पडणं अवघड झालं असेल. कारण- बोलण्याच्या ओघात ती बोलून गेली. पण, आपण खूप विषय उचलून धरला. इथंही तेच आणि तसंच होतंय. विनाकारण एका व्यक्तीला ट्रोल केलं जातंय.लक्षात घ्या, आपण कोल्हापूरकर असे नाहीत.”
पुढे तो म्हणाला, “समजा, ती चुकली असेल, तर तिच्या कानाला धरून इथे कोल्हापूरमध्ये आणेन आणि माफी मागायला लावेन. मी जाईन, तिला सांगेन की, ही चूक आहे, हे चुकलं आहे. तू आमच्या कोल्हापूरकरांची माफी माग. पण, तिनं कसलंही वाईट वाक्य वापरलेलं नाही. थोडंसं समजून घ्या. मी एक कोल्हापूरकरच आहे; पण कोल्हापूरची प्रेमळ भाषा हरवतेय, असं मला वाटत आहे. त्यामुळे कृपया आपल्या कोल्हापूरला महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीनं दाखवू नका.”
हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, “माझा कोल्हापूरला पाठिंबा आहे; पण बाजू समजून घेणं गरजेचं आहे.”
