‘वटपौर्णिमा’ हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास नवऱ्याचे आयुष्य वाढते अशी मान्यता आहे. त्यामुळे आजचा हा वटपौर्णिमेचा सण सर्वसामान्य महिलांपासून ते अगदी अभिनेत्रींपर्यंत जवळपास सगळ्याच साजरा करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींनी साजऱ्या केलेल्या वटपौर्णिमेचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अशातच अभिनेत्री धनश्री काडगांवकरनेही वटपौर्णिमा साजरी केली असून याची खास झलक तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमधून वहिनीसाहेब या भूमिकेमुळे धनश्री घराघरांत पोहोचली. या मालिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. आपल्या विविध भूमिकांमुळे चर्चेत राहणारी धनश्री सोशल मीडियावरही विशेष सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अशातच तिने वटपौर्णिमानिमित्त व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओसह तिने पोस्टही लिहिली आहे. या पोस्टमध्ये धनश्री असं म्हणते, “लग्न झाल्यापासून खऱ्या आयुष्यात वटपौर्णिमा कधी केलीच नाही. कारण तसा वेळच मिळाला नाही. हा… पण मी केलेल्या प्रत्येक मालिकेमध्ये अगदी आवर्जून नटून थटून ही पूजा केली. यावर्षी म्हटलं चला मार्गदर्शनाला आई पण आहे; तर करूया…”
यानंतर ती म्हणते, “खऱ्या आयुष्यात याचे १०० शॉट्स नसतात. ७ म्हणजे ७ च फेरे. फोटो आणि व्हिडीओसाठी काही कमी जास्त नाही. त्यामुळे तेवढ्यात जितकं फुटेज मिळालं तितकंच. तर खऱ्या आयुष्यातली ही माझी पहिली वटपौर्णिमा.” यानंतर तिने नवऱ्याचा उल्लेख करत “दुर्वेश हे सगळं तुझ्यासाठी आहे” असं गंमतीने म्हटलं आहे. धनश्रीच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, धनश्रीबद्दल सांगायचं झालं तर, ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मुळे तिला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकांमध्ये झळकली. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय ती ‘तू चाल पुढं’ या मालिकेतही पाहायला मिळाली होती.