मुंबई आणि परिसरासह राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं असून, अनेक भागांत शाळांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय सोमवारी ( ६ जुलै ) पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झाली होती. मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक २च्या प्रवेशद्वारावर सोमवारी पहाटे अचानक दरड कोसळल्याने संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती. आज तब्बल साडेअठरा तासांच्या प्रयत्नांनंतर पुणे-मुंबई मिसिंग लिंक मार्गिका सध्या अंशत: खुली करण्यात आली आहे. जवळपास १०० टन ढिगारा पुलावर पडला होता.
मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे अनेक प्रवाशांचा तासन् तास खोळंबा झाला होता. रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाल्याने संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर सुद्धा या वाहतूक कोंडीत जवळपास ९ तास अडकली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धनश्री काडगांवकर म्हणते, “मुसळधार पाऊस, अपघात किंवा दरड कोसळल्यामुळे एक्स्प्रेसवेवर झालेली वाहतूक कोंडी यांसारख्या घटना मी यापूर्वी फक्त बातम्यांमध्ये पाहिल्या होत्या. पण, काल ( ६ जुलै २०२६ ) मला स्वत:लाच या परिस्थितीचा सामना करावा लागला. अशाप्रकारे सलग ९ तास वाहतूक कोडींत अडकून राहणं हे प्रचंड थकवणारं आणि वैताग आणणारं होतं. यादरम्यान मला मासिक पाळी सुद्धा आली होती. पण, वॉशरूमला सुद्धा जाता आलं नाही. फूड कोर्टवर काहीतरी खाऊया म्हटलं…तर तेही शक्य नव्हतं. गुडघाभर पाणी साचलं होतं, कुठं ओलं व्हा, आजारपण आता परवडणारं नाहीये, कारण सलग शूटिंग सुरू आहे.”
“माझा ड्रायव्हर मला बोलत होता…मॅडम आपण परत पुण्याला जाऊयात. पण, आम्ही कलाकार नेहमी कमिटमेंट पाळतो…टेलिकास्ट अडकला होता म्हणून, शेवटी मी हळुहळू का होईना पण सेटवर पोहोचले. निसर्गापुढे कोणाचं काहीच चालत नाही पण देवापुढं इतकीच प्रार्थना की कोणाचं जगणं मुश्किल होईल इतकं मोठं आणि भयानक काही होऊ देऊ नकोस.” असं धनश्रीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, धनश्रीच्या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी सुद्धा पावसाच्या दिवसात प्रवास करताना तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
