Dhanashri Kadgaonkar Talks About Tujyat Jeev Rangala Serial : धनश्री काडगावकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली ते ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे. त्यामध्ये तिनं खलनायिकेची भूमिका साकारलेली. अशातच आता तिनं याच मालिकेदरम्यानचा अनुभव सांगितला आहे.

धनश्री शेवटची ‘तू चाल पुढे’मध्ये झळकलेली. त्यानंतर तिनं वेब सीरिजमध्ये काम केलं. धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि त्यामार्फत ती तिच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल तिच्या चाहत्यांना सांगत असते. अशातच अभिनेत्रीनं नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं तिच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

धनश्री काडगावकरने सांगितला अनुभव

मुलाखतीत धनश्री मालिकेबद्दल म्हणाली, ” ‘तुझ्यात जीव रंगला’चा तो वाडा कायम माझ्या आठवणीत राहील. कारण- चार वर्ष मी काम केलं तिथे. मी गमतीत म्हणायचे की, इथे अशी एकही फरशी नसेल जिथे मी माझा सीन केला नाही. त्या संपूर्ण वाड्यात मी सीन केले आहेत. त्या वाड्यानं खूप प्रेम दिलं. ती जागाच खूप भारी होती. ते राहतं घर होतं. तिथलं कुटुंबही खूप चांगलं होतं. त्यांना कधी चहा करून द्याल का, असं विचारलं की, ते प्रेमानं चहा करून द्यायचे.”

एसी, मेकअप रूम काहीच नव्हतं – धनश्री काडगावकर

धनश्री पुढे म्हणाली, “तिथला आजूबाजूचा परिसर खूप कमाल होता. किती लोक मला म्हणायचे की, वहिनीसाहेब, तुम्ही उभ्या राहा. या वर्षी तुम्हाला तिकीट मिळतंय वगैरे. खूप मस्त होतं ते सगळं. त्या वाड्यातला अनुभव खूप मस्त होता. म्हणजे आमची कधी कधी इतकी गैरसोय व्हायची; पण तरीही ते फारच स्मरणात राहिलेले किस्से आहेत. कारण- एवढे लोक आम्हाला बघायला रोज यायचे. लंचपर्यंत खूप गर्दी झालेली असायची. आम्ही वरून बघायचो की, वॉशरूमला जायचं आहे; पण खाली गर्दी आहे का वगैरे आणि वॉशरूम खाली होतं. एसी वगैरेही नव्हता.”

धनश्रीनं पुढे सांगितलं, “तिथे मेकअप रूम वेगळी नव्हती. एक मुलींची आणि एक मुलांची मध्ये फक्त फळी लावली होती. तेव्हा असं वाटायचं की, काय यार आपण कलाकार आहोत हे काय आहे वगैरे. पण, आम्ही तिथे रमलो. आम्हाला लोकांना बघावं लागायचं की, ते गेलेत का मग वॉशरूमला जाऊयात. कारण- लोकांसमोर कसं जाणार वगैरे. तर असे खूप छोटे छोटे किस्से आहेत.”

‘तुझ्यात जीव रंगला’बद्दल धनश्री पुढे म्हणाली, “कितीही गैरसोय असली तरी ती मालिका लोकांपर्यंत पोहोचली. ते पात्र पोहोचलं आणि त्याचं कौतुक अजूनही मी अनुभवत आहे. त्या वास्तूनं खूप काही दिलं. अंबाबाईच्या त्या शहरानं खूप दिलं. मी नुकतीच तिथे जाऊन आले आणि देवळात मी दोन तास बसून होते. मला खूप छान वाटतं.”