Digamber Naik Talk About Bigg Boss Marathi : मराठी नाटक, मालिका, सिनेमा आणि विनोदी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे दिगंबर नाईक. आजवर ते विनोदी, खलनायक आणि गंभीर अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘फू बाई फू’सारख्या रिअॅलिटी शोबरोबरच त्यांनी ‘बिग बॉस मराठी’सारखा शोसुद्धा केला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनमध्ये ते सहभागी झाले होते.

‘बिग बॉस मराठी २’मध्ये सहभागी झालेले दिगंबर नाईक अवघ्या तीन आठवड्यांत ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडले. याच ‘बिग बॉस’च्या जुन्या आठवणींबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. दिगंबर नाईक नेमकं काय म्हणालेत? चला जाणून घेऊ…

“तिकडे जास्त दिवस टिकू शकलो नाही” – दिगंबर नाईक

राजश्री मराठीशी साधलेल्या संवादात त्यांना ‘बिग बॉस’ने काय दिलं असं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले, “‘बिग बॉस’ने काय दिलं हे सांगता येणार नाही. कारण- मी तिकडे तीनच आठवडे होतो. मी तिकडे जास्त दिवस टिकू शकलो नाही. मला खोटं काही करता येत नाही. तिकडे सगळे ठरवून जावं लागतं. फक्त भांडण करणे हा खेळ होऊ शकत नाही. पण मी तीन आठवड्यांनी बाहेर पडलो, तेव्हा सोशल मीडियावर ‘याला फक्त गाऱ्हाणंच घालता येतं’, ‘याला हेच येतं, तेच येतं’ अशा अनेक नकारात्मक कमेंट्स होत्या. पण काही प्रतिक्रिया या सकारात्मक होत्या किंवा मी काही कार्यक्रमांना जात असे तेव्हा लोक भेटायचे. तेव्हा मला ते ‘सर तुम्ही वेगळेच आहात. तुम्ही चांगले आहात;म्हणून तुम्ही तिकडे टिकू शकला नाहीत,’ असं म्हणायचे.”

Award Banner

दिगंबर नाईक ‘बिग बॉस मराठी सीझन ६’बद्दल म्हणाले

यानंतर त्यांना सध्या सुरू असलेला ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन बघता का असं विचारलं गेलं. यावर दिगंबर नाईक म्हणाले. “नाही बघत.. कारण मला आतमध्ये राहून सगळं कळलं आहे. आपल्याला जे सांगतात की, जास्त वोट यांना मिळाले आहेत वगैरे… पण असं काही नसतं. असे कुठलेच मेसेज वगरे येत नाहीत किंवा कदाचित येत असतीलही… कारण तोही एक बिजनेसच आहे. पण ‘तुला दोन हजार मेसेजेस कमी आले आहेत’, असं काही नसतं. हे सगळं खोटं आहे…”

यानंतर ते म्हणाले, “‘फू बाई फू’च्यावेळी मला ६ लाख ८० हजार वगैरे वोटिंगचे मेसेज आले होते. कार्ड घेऊन माझ्यासाठी माणसे बसवली गेली होती. माझ्यावर इतके प्रेम करणारी माणसे होती. पण हे सगळं इतकं मॅनेज केलं जातं आणि इतकं ठरवून केल जातं की, तेव्हा नुकतेच यूट्यूब आले होते, तेव्हा यूट्यूबचे हिट्ससुद्धा कमी केले गेले होते. मला जिंकवून आणायचे नाही, हे ठरवलंच होतं. इतकं मॅनेज का केलं जातं, हे मला अजूनही समजलं नाही. अर्थात त्याने मला काही फरकही पडला नाही.”

“बिग बॉस मराठी शोमध्ये जायचे नव्हते” – दिगंबर नाईक

“‘फू बाई फू’च्या वेळी जे झालं तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या वेळी झालं. मला त्या शोमध्ये जायचंसुद्धा नव्हतं. निखिल साने यांच्याबरोबर माझ्या खूप मीटिंग्स झाल्या. ती सगळी प्रक्रिया खूप भयानक असते. त्यामुळे ‘बिग बॉस’ने काय दिलं सांगायचं झालं, तर मी एकटं राहू शकतो हे मला कळलं. मोबाईल, टीव्ही, घडयाळ, लिखाण, वाचन या सगळ्याशिवाय मी राहू शकतो, याचा अनुभव मला ‘बिग बॉस’च्या घरात आला आणि पैसेही मिळाले” असे ते यावेळी म्हणाले.