Dilip Joshi on Disha Vakani: काही कलाकार त्यांच्या भूमिका इतक्या बखूबीने निभावतात की त्यांच्याऐवजी इतर कोणाला त्या पात्रात पाहणे प्रेक्षकांना कठीण जाते. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील दयाबेन हे असेच पात्र आहे. ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने साकाराली होती.
या मालिकेत जेठालाल, बापुजी, भिडे मास्तर, अय्यर, बबिता, पोपटलाल, अब्दुल, टपू सेना, सोडी, तारक मेहता, अंजली, कोमल अशी अनेक पात्रे आहेत. विविध राज्यांतील, विविध भाषा बोलणारी, संस्कृती जपणारी अशी पात्रे पाहायला मिळतात.
ते राहतात त्या सोसायटीचे नाव गोकुळधाम सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. एकमेकांच्या संकटाच्या काळात ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मालिकेतील सर्व पात्रे लोकप्रिय असले तरी जेठालाल आणि दयाच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. त्यांच्यातील छोटी-छोटी भांडणे, एकमेकांवरील प्रेम, डायलॉग या सगळ्यामुळेच त्यांची जोडी लोकप्रिय ठरली.
दयाची बोलण्याची स्टाईल, आनंद व्यक्त करण्याची पद्धत, गरबा खेळण्याची स्टाईल अशा अनेक गोष्टींमुळे दया हे पात्र लोकप्रिय ठरले. दिशाने २०१७ मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला. मात्र, त्यानंतर ती मालिकेत पुन्हा आली नाही. तेव्हापासून प्रेक्षक दया या पात्राला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दिशा मालिकेत पुन्हा कधी परतणार, दया हे पात्र कधी पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
“जवळजवळ १० वर्षे…”
मालिकेला नुकतीच १८ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मालिकेतील सर्व कलाकार एकत्र जमले होते. यावेळी जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी दिशा वकानीबद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले, “जवळजवळ १० वर्षे दयाजी या शोबरोबर जोडल्या गेल्या होत्या. लोकांना माहीत आहेच की आम्ही अनेक चांगले सीन एकत्र केले आहेत. जी केमिस्ट्री होती, घरातील जे सीन व्हायचे, त्याची आठवण येते.”
पुढे ते असेही म्हणाले, “अगदी काहीच दिवसांपूर्वी असितजी मला सांगत होते की घरातील जे सीन व्हायचे, तसे सीन मालिकेत असायला हवेत असे वाटते. त्यांच्या डोक्यात सीनबद्दल कल्पना असते. पण, ते स्क्रीप्टमध्ये घेऊन येऊ शकत नाहीत. निश्चितपणे एक कलाकार म्हणून दिशाजीने ज्या पद्धतीचे काम केले आहे, त्याची आठवण येते. मी आशा करतो की काहीतरी चमत्कार व्हावा आणि त्या शोमध्ये परत याव्यात.”
दरम्यान, दिशा वकानीने शो सोडून ९ वर्षे झाली आहेत, पण इतर कोणत्याही अभिनेत्रीला दिशाच्या जागी घेतलेले नाही.
